(लेखक: जयंत पोटे)
नवसाला पावणाऱ्या देवांची कीर्ती फार लवकर पसरते. त्यामुळेच हल्ली "स्वयंभू" देवस्थानांपेक्षा "नवसाला पावणारा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवांना जास्त लोकप्रियता मिळत आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या भावनेचा सरळसरळ व्यापार आहे. परंतु "नवस" बोलणे ही खास मानसिकता आहे आणि तिचा कितीही उदात्त भूमिकेतून विचार केला तरी ते देवाला देऊ केलेले एक आमिष आहे.

नवसाला पावणाऱ्या देवांची कीर्ती फार लवकर पसरते. त्यामुळेच हल्ली "स्वयंभू" देवस्थानांपेक्षा "नवसाला पावणारा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवांना जास्त लोकप्रियता मिळत आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या भावनेचा सरळसरळ व्यापार आहे. परंतु "नवस" बोलणे ही खास मानसिकता आहे आणि तिचा कितीही उदात्त भूमिकेतून विचार केला तरी ते देवाला देऊ केलेले एक आमिष आहे.
सुमारे ३० वर्षापूर्वी महाराष्ट्रातले एक थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी या नवसप्रेमींची चांगलीच कानउघडणी केली होती. परीक्षेला जाताना मुलगा देवापुढे नवस बोलतो की पास झालो तर पेढे वाटेन. तुला अर्धा किलो पेढे वाहीन. त्यावेळी त्या परीक्षार्थी मुलाला हेच म्हणायचे असते की अभ्यास नाही केला ही माझी चूक आहे पण अर्धा किलो पेढे घे आणि माझी ही चूक माफ कर. त्याहीपुढे जाऊन मुलाचे मन म्हणत असते की हे अर्धा किलो पेढेही आपणालाच खायला मिळणार आहेत. ते देवाला नुसते "दाखवावे" लागणार आहेत.
काही वर्षापूर्वी तिरुपतीच्या मंदिरात सहा कोटी रुपयांची अवाढव्य रक्कम "हुंडी" नावाच्या खजिन्यात अज्ञाताने टाकली. चक्राऊन टाकणारा भाग असा की केंद्र सरकारच्या एक्साईज कस्टम विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगता आपणाला १० कोटीपेक्षा जास्त लाभ झाला तर त्यातला निम्मा वाटा बालाजीला द्यायचे कबूल केले होते व त्या करारानुसार ६ कोटींचा वाटा पेटीत टाकला होता! अशा काळ्या उत्पन्नाचा वाटा घेऊन तिरुपती देवस्थानम जर लोकोपयोगी कामे, शाळा, कॉलेजे, हॉस्पिटल असे कल्याणकारी उद्योग करणार असेल तर हा देव कुणाचा म्हणावा?
एखादे संकट, एखादा आजार नवसामुळे दूर होतो असे मानायचे तर शंभरातल्या ९५ जणांच्या बाबतीत तो प्रत्यय आला पाहिजे. पण तसे होत नाही हे उघडच आहे. पण ज्या पाचजणांना प्रत्यय येतो ते त्याची जाहिरात करतात. ९५ लोक आपल्या नशिबाला बोल लावत गप्प बसतात.
अगदी परवापर्यंत मांढरदेवीच्या यात्रेत चार-पाच हजार बोकड कापले जायचे. १९९८ साली सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या बंद करण्याचा निर्णय झाला. पण त्या ठिकाणी तट्ट्याचा, मांडवाचा तात्पुरता आडोसा करून ही बळी देण्याची प्रथा चालू राहिली. केवळ कायद्यातून पळवाट काढून अशा अघोरी प्रथा चालू ठेवण्याचा अट्टहास का केला जातो? देवाला बळी देण्यासाठी हत्ती, सिंह असे भारदस्त प्राणी अगदी प्राचीन काळापासून चालत नाहीत. सरकारने "प्राणी संरक्षण" कायदा करण्याच्या काळापुर्वीसुद्धा कोंबडी, बकरे असे "खाद्य" जीवच का बळी दिले जात असत? केवळ ते मांसाहारी लोकांचे जेवण आहे म्हणूनच ना? रेडा, गाढव वा अन्य भाकड जनावरे देऊन नवस फेडला जाणार नाही यामागे दुसरे कुठले कारण असेल सांगा ना!
हल्ली गणेशोत्सवातही "नवसाला पावणारा" ही जाहिरात अग्रक्रमाने केली जाते. लालबागचा राजा किंवा गिरगावचा राजा यांच्या आता गावोगावी आवृत्या निघत आहेत व नवसाला पावणारा ही कॅचलाइन ठळकपणे चमकत असते. मग हे खास नवसवाले सोडून अन्य सामान्य गणपती कुणासाठी बसवले जातात व नवसाला पावण्याची शक्ती त्यांच्यात असते की नसते?
देव ही एक सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व सर्व कार्याला आशीर्वाद देणारी श्रद्धा आहे. लाखो वारकरी पंढरीच्या वारीला दरवर्षी जातात. ते पांडुरंगाला कोणता नवस बोलतात? शासकीय पूजेचा मान मिळवणारे मंत्री टीव्हीसमोर त्या विठोबाला "पाउस पाड" असा आग्रह धरतात. बाकीचे सर्व भक्त मात्र त्याचे "दर्शन" घेऊनच समाधान मानतात. देण्याघेण्याच्या गोष्टी न करता माघारी फिरतात.
नवस बोलून मनाची श्रद्धा जपणे, मानसिक आधार शोधणे ही गोष्ट वेगळी. पण सामान्यांच्या ह्या भावनेतुन मंदिर व्ययस्थापकांनी धंधा करण्याचा प्रकार नक्कीच आक्षेपार्ह आहे. देवाला वाहिलेले दागिने, देवीला अर्पण केलेली साडीचोळी ही सश्रद्ध भावनेने भक्ताने दिली तर मागच्या दाराने देवस्थान कमिटीला त्याची विक्री करण्याचा - लिलाव करण्याचा अधिकार कोण देतो? तीन मीटर साडीची रक्कम घेऊन दीड मिटर देणे हा भक्तांना लुबाडण्याचा दुकानदाराचा उद्योग आणि मी श्रद्धेने देवाला अर्पण केलेली वस्तू विकून तिचा पैसा करून त्याचा आपल्या मर्जीप्रमाणे विनियोग करून भक्तांची मानसिक फसवणूक करण्याची मंदिर व्यवस्थापनाची वृत्ती यात काय फरक राहिला?
"नवसाला पावणारे" अशी देवदेवतांची स्वतंत्र वर्गवारी निर्माण करणारे चलाख धर्मप्रसारक आणि मंदिराचे "मार्केटिंग" करण्याचा नवा उद्योग भरभराटीला आणणारे नवश्रीमंत, राजकारणी, उद्योगपती यांचा एक घट्ट विळखा आज देवांभोवती पडत आहे. ज्याप्रमाणे दाग-दागिने, सोने-नाणे खरेदीची "क्रेझ" लोकांत वाढवण्यासाठी आपली संस्कृती, परंपरा, खानदान या गोष्टींचा उपयोग सराफ व्यावसायिक करून घेतात. त्याच पध्दतीने असहायता, परिस्थिती शरणता आणि मानसिक दौर्बल्य यातून मार्ग काढण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्यांना "श्रद्धा" हा मोठा मानसिक आधार देण्याचे काम देवांच्या दलालांनी चालवले आहे.
आपल्या व्यावहारिक जीवनात एकीकडे "मनुष्याला जे नशिबात असेल तेच मिळते, जगात मोफत किंवा फुकट काहीच मिळत नाही" अशा उक्तींचा प्रत्यय येत असतो व त्याचवेळी "देवाकडून काही हवे असेल तर त्याची किंमत मोजावी लागते" ही व्यवहारवादी वृत्ती डोके वर काढते. त्यातूनच मग सिद्धीविनायकापुढे चार-पाच तास रांगेत घालवताना वेळेची काळजी वाटत नाही. "इस हाथसे दो, उस हाथसे लो" हा रोखठोख व्यवहारी बाणा आपल्या सर्व जगण्याचे नियंत्रक बनला आहे. त्याचाच प्रभाव आपल्या श्रद्धा, आपली वैचारिक निष्ठा व आपली मानसिकता यावर पडत आहे.
विज्ञाननिष्ठा वा बुद्धिप्रामाण्य ही जुन्या जगातली पारंपारिक मुल्ये होती. आता आपण उपयुक्ततावादाच्या नव्या जगात प्रवेश केला आहे. या नव्या जगात आता नव्या मुल्यांची प्रतिष्ठापना अपरिहार्य ठरली आहे. नवसाला पावणारे देव निर्माण करून आपण या नव्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे!
No comments:
Post a Comment