(लेखक: विद्या बाळ)
माझ्या घरात देव नाही आणि मी देवाच्या दर्शनालाही जात नाही. पण कुणाच्या घरी देव असेल, त्याची नियमाने किंवा सोयीने पुजा होत असली, त्यासाठी देवाला वाहिलेल्या फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध दरवळत असला, देवापुढे बारीक रेघांची सुरेख रांगोळी घातली गेली तर त्यामुळे माणसांचे मन आणि वातावरण प्रसन्न होऊ शकत असं मला वाटत. अशा पूजेत एखादा मित्र समजून जिवाभावाच्या गोष्टी, मनातल्या दुखावणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या भावना बोलत देवाशी केलेला केवळ संवाद हि सुध्दा एक छान गोष्ट असेल.

मी एक मध्यमवर्गीय शहरात वाढलेलं माणूस आहे. ब्राह्मणी मध्यमवर्गीय कुठुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी, परंपरा, व्रत वैकल्ये यांच्या संस्कारात मी लहानाची मोठी झाले. एवढेच नाही तर जवळपास निम्मेअधिक आयुष्य मी या सगळ्याचे परिपालन आणि जतन करत आहे. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदल होण्याची प्रक्रिया सुरु झली. त्यातून मी आज इथवर पोहोचले आहे कि आता मी देव मनात नाही, धर्म मानत नाही, विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कार्माकांडापैकी मी काहीही करत नाही. हा माझा व्यक्तिगत प्रवास आहे. त्याची बढाई मारण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी मी तो तुमच्यापुढे ठेवलेला नाही. माझ्यापेक्षा वेगळ्या विचारांनी आयुष्य जगणाऱ्या माणसांपर्यंत मला पोहोचायचे आहे. देव, धर्म, अंधश्रद्धा यामुळे होणारी दिशाभूल, फसवणूक, शोषण, विवेकबुद्धीचा ऱ्हास आणि त्यापायी उध्वस्त होणारी माणसांची आयुष्यं याची मला काळजी वाटते. त्यासाठी त्यांना समजून घेत, त्यांच्याशी संवाद होण्याची मला गरज वाटते.
मला हे हि सुरुवातीला सांगायला हवं कि, देवाधार्मातल्या काही गोष्टी फारश्या उपद्रवी किंवा हानिकारक नाहीत आणि म्हणून त्या करायला हरकत नाहीत असं मला वाटत. त्या करताना आपण त्या नक्की का व कशाकरता करतो आहोत, याचा स्पष्ट आणि प्रामाणिक विचार आपल्या ठायी जागा हवा. हे फार महत्वाचे आहे. उदाहरणार्थ देवपूजा. माझ्या घरात देव नाही आणि मी देवाच्या दर्शनाला जात नाही. पण कुणाच्या घरी देव असेल, त्याची नियमाने किंवा सोयीने पुजा होत असली, त्यासाठी देवाला वाहिलेल्या फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध दरवळत असला, देवापुढे बारीक रेघांची सुरेख रांगोळी घातली गेली तर त्यामुळे माणसांचे मन आणि वातावरण होऊ शकत असं मला वाटत. अशा पूजेत एखादा मित्र समजून जिवाभावाच्या गोष्टी, मनातल्या दुखावणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या भावना बोलत देवाशी केलेला केवळ संवाद हि सुध्दा एक छान गोष्ट असेल. त्याच्या पलीकडे देवाकडून बऱ्या वाईट घटनांबाबत काही कृती घडेल, तो त्यांना अटकाव करेल, किंवा आपल्या उत्कर्षाला गती देईल, अशी काही अपेक्षा मनात न ठेवता जर देवाशी असा संवाद होत राहिला तर कोणत्याही औषधोपचारांच्या बरोबरीने तो स्वास्थासाठी एक परिणामकारक उपचार ठरू शकेल. मन मोकळं करण्यासाठी ती एक स्वतःची स्वाधीन जागा असेल.
देवपूजा करण्याबाबतचा मला वाटणारा धोका एवढाच आहे कि देव आपलं बोलणं ऐकून घेतो, याचा अर्थ त्यावर उपाय योजना करणाराही तोच आहे, असा एक विश्वास मनामध्ये घर करू लागतो. आता बघा, देवाची मूर्ती तर माणूसच घडवतो. आपणच खर्च करून ती विकत घेतो, घरात आणून देव्हाऱ्यात ठेवतो. अशावेळी ती मूर्तीच आपल्या आयुष्यातल्या बऱ्यावाईटाची निर्मिती आणि तारकर्ती हे कसं मान्य करायचं? एकदा या देवशरण भावनेनं आणि भक्तीने देवाचा प्रवेश झाला, की मग सगळं संपलंच. खरं तर ती केवळ एक मूर्ती. आपणच तिची प्रतिष्ठापना केली. तिला ना दिसतं, ना तिच्यात जीव असतो. याचा आपल्याला विसर पडून कसा चालेल?
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की, जोपर्यंत रोजचं रहाटगाडगं नीट चालत असतं तोपर्यंत देवाची आणि आपली कसोटीच लागत नाही! पण कोणतही संकट आलं, अपयश आलं की त्याच निवारण देव करील असं वाटणं घातक आहे. कारण त्यात परावलंबित्व आहे. समजा आपल्या व्यावहारिक प्रयत्नातून आपण संकटातून पार पडलो आणि तरी त्याचं श्रेय तुम्ही देवाला दिलं तर दिलं! मला काय त्यासाठी देवाचा हेवा वाटणार नाही. पण आपण आटोकाट प्रयत्न करूनही, देवाला साकडं वगैरे घालूनही व्हायचं ते विपरीत घडलच, तर मग स्वतःची समजूत कशी घालायची? देवाला आधार मानून त्याच्यावर सगळा भार टाकला आणि संकट निवारण झालं नाही तर …? जो खरा आधार नाहीच, त्याचाच आधार घेतला तर आपण पडणारच! देव मानून त्यावर विसंबल्यामुळे येणाऱ्या परावलंबित्वाचा पराभव फार कोसळायला लावणारा आहे. कारण देवामुळे परावलंबनाची सवय लागली तर स्वतः स्वतःलाच सावरायची सवय नाहीशी होते! त्यापेक्षा भल्या आणि बुऱ्या दोन्ही अनुभवांना सामोरे जाण्याची ताकद मिळवत राहणं, आपल्या निर्णयांची, आपल्या वागण्या-राहण्याची, त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची सवय करणं, हा अधिक भरवशाचा मार्ग आहे, असं नाही वाटत?
यावर कुणी म्हणेल की, इतका विचार करण्याचा खंबीरपणा कुठे सगळ्यांमध्ये असतो? मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आपण स्वतःला वगळून इतरांना सामान्य माणसं म्हणतो आणि त्यांच्या विचारशक्तीला कमी लेखतो. प्रत्यक्षात आपली "चूप बसा" ही संस्कृती आपली जिज्ञासा, उत्सुकता यांना वाव न देता खुरवटुन टाकते! विशेषतः देव, धर्म, संस्कृती यांच्यासंबंधीच्या शंका, प्रश्न विचारणं हा आपल्याला उद्धटपणा वाटतो. देव आणि धर्म यांचे स्थान आपल्यावरच्या संस्कारातून मनात घट्ट रुतून बसलेलं असतं. त्यांचीच भीती दाखवत आपण मुलांना आणि सगळ्यांनाच चांगलं वागायला सांगतो. माझी एक मैत्रीण सांगत होती की, तिच्या माहेरच्या घरात देवा-धर्मचं काहीही प्रस्थ नव्हतं. लग्नानंतर सासरी मात्र देव देव करीत बऱ्याच गोष्टी करायला लागल्या! ती साऱ्या गोष्टी करत होती. पण त्यामागचं कारणं मनात भीती निर्माण करू लागली. अमुक एक गोष्ट केली नाही तर देवाचं काहीतरी बिनसेल, या भीतीपोटी ती सारी कर्मकांड मुकाट्याने करते आहे! माझ्या मनात आलं -- ज्याची भीती वाटते त्याची भक्ती कशी करता येईल?
सर्वसामान्य माणसानं "चांगलं माणूस" म्हणून जगणं हेच तसं चांगलं आहे, हे देवाधर्माच्या कर्मकांडातून पोहोचण्याऐवजी विचारातून, कार्यकारणभाव स्पष्ट करत पोहोचवणं आवश्यक आहे. याचा परिणाम अधिक टिकाऊ ठरेल. माणसाच्या विचार करण्याच्या सामार्थ्यानेही हा विचार करायला हवा, कि देव आपल्याला बागलबुवा म्हणून हवा कि सखा म्हणून हवा? लहान मुलांना असं सांगितलं जातं की खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस. कारण काय तर देवाचं सगळीकडे लक्ष असतं आणि तो तुला शिक्षा करेल. पण प्रत्यक्षात कधी कधी खोटं बोलून, चोरी करून मुलांना तत्कालीन फायद्याचा आनंद मिळाला आणि हे वागणं उघडकीला आलं नाही तर देवाचा धाक खोटा असल्यालाच त्यांना समजेल आणि ती कदाचित अधिकच निर्ढावतील! त्यापेक्षा चांगलं का वागायचं, हे त्यांना थेट समजावून का सांगू नये? अलीकडेच लोकसत्तामध्ये अभय टिळक यांनी त्यांच्या एका लेखात मांडलेला विचार यासंदर्भात समजून घेण्यासारखा आहे. ते लिहितात - "देवाशी सोयरिक करणे हि संतांनी तुम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी आहे! जबाबदार सदाचाराचे, उचित आणि नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव! हे विसरून आज देवाची रवानगी देव्हाऱ्यात झाली आहे". याला हात जोडून मला म्हणावेसे वाटते की, एक वेळ देव्हाऱ्यातला देव हा फोटोतल्या मित्रासारखा मानता येईल. ते मी समजू शकतो. पण आता तर लोक देवाला मनातही नाही, घरातल्या देव्हाऱ्यातही नाही, तर चक्क रस्त्यावर बसायला आणि उतरवायला लागले; आणि वर त्याचा व्यापारही मांडताहेत!
देव दयाळू, कृपाळू आहे. त्याला सगळं दिसतं, समजतं आणि तो सगळ्यांचं रक्षण करतो - असा देवाविषयीचा एक भक्तीभाव आपल्या मनात लहानपणापासून सजलेला असतो. त्यातूनच देवावर भार टाकणं, त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होणं सुरु होतं. याचाच परिणाम म्हणून त्याला काही "देणं" सुरु होतं. कधी स्वखुशीने, कधी बडव्यांच्या मागणीनुसार! अशा वेळी वाटतं - देव काय व्यापार करायला बसला आहे? तुमची जेवढी भक्ती, जेवढं दान; त्यानुसार त्याच्या कृपेचा ऐवज तुमच्या पदरात पडणार? म्हणजे श्रीमंतांच्या/गरीबाच्या भक्तीच्या नव्हे तर दानाच्या प्रमाणात त्याला लाभ होणार? त्यापेक्षा "कांदा-मुळा-भाजी" देवाला अर्पण करणारा सावता माळी विठठ्लाशी किती सोयाऱ्यासारखा वागता-बोलताना दिसतो! अगदी मनापासून भक्ती करणाऱ्यावर देव प्रसन्न होतो का? मग एखाद्या आनंदाच्या घटनेनंतर देवाच्या पाया पडायला जाणाऱ्यांच्या गाड्यांना अपघात का होतात? ही माणसं तर देवाच्या दारी आनंद साजरा करायला गेली होती ना? त्यांनाही जर देव अपघातातून वाचवू शकला नाही तरी त्याचा देवावरचा विश्वास अढळ कसा राहू शकतो? तिथं थोडं थांबून विचार व्हायला हवा.
अलीकडेच दिवेआगरच्या देवळातील मौल्यवान अशी देवाची मूर्ती चोरीला गेली! आता म्हणे काही भक्तजन पुन्हा तशीच सोन्याची मूर्ती करून देवळात बसवणार आहेत! देवाला स्वतःचं रक्षण करता आलं नाही म्हणून आता सरकारी सुरक्षा मागून माणसं देवाच रक्षण करणार! म्हणजे देवापेक्षा सुरक्षारक्षकच भारी ठरणार! आता म्हणे, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दागिन्यांच मोजमाप करताहेत. मोजलेल्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सोन्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकणार. म्हणजे पुन्हा एकदा चोरांना निमंत्रण! बालाजी काय, तिरुपती काय, शिर्डीच साईबाबा मंदिर काय; देवाच्या पायी हा सोन्यामोत्यांचा डोंगर कशासाठी उभा करायचा? त्यासाठी मग देवळांच व्यवस्थापन आलं. विश्वस्त मंडळ आलं. त्यांच्यावरचे खटले आले! सावकाराकडे दागदागिने गहाण टाकतात तशी माणसानं देवाकडे विचारशक्ती गहाण ठेवली आहे का?
शंभर सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात पासष्ठ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगताहेत! ना त्यांच्या डोक्यावर छप्पर, ना अंगभर कपडा, ना पोटभर अन्न, ना शिक्षण, ना आरोग्यसुविधा. या साऱ्याकडे डोळेझाक करत देवांना सोन्याच्या दागिन्यांनी मढवायच, त्यांच्या जेवाणाखाण्याचे भोग आणि दुधाचे अभिषेक करायचे, त्यांच्या देवळांचे कळस सोन्याचे करायचे आणि दारांना सोन्याचे पत्रे बसवायचे! देव मानणारे लोक हे काय करताहेत? देवावर विसंबणाऱ्यांच्या मला अपमान करायचा नाही; पण मला त्यांची काळजी वाटते. कारण माणसाजवळचं मेंदू नावाचं विचाराचं साधन ते गंजत ठेवताहेत! संकटकाळी त्यांच्या देवानं त्यांना तारलं नाही तर ते कोसळून पडतील याची मला चिंता वाटत आहे!
त्या सगळ्याच्या पलीकडचा आणखी एक मुद्दाही महत्वाचा आहे. देवापर्यंत पोचवण्याचा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीचा उपाय सांगण्याचा बहाणा करत जे भोंदू आपल्या नावाला स्वतःच बाबा, महाराज, मां, देवी इ. उपाधी जोडून लोकांना लुटण्याचा धंदा करतात त्यांचं काय? अध्यात्माची भाषा वापरत, गूढ वातावरणाच्या अंधारात भरमसाठ पैशाची मागणी करून ही मंडळी असंख्य माणसांची फसवणूक करतात! त्यांचं मार्गदर्शन खूपच महागडं असतं! कारण त्यांचा प्रपंच तुकाडोजीमहाराज, गाडगेबाबा किंवा नामदेव-तुकारामांसारखा सर्वसामान्यांचा नसतो. तो अत्यंत विलासी आणि पंचतारांकित पातळीवरचा असतो. ते जनतेचे मार्गदर्शन नव्हतेच. सत्यसाईबाबा निधन पावल्यानंतर त्यांच्या वारसाबाबत झालेला वाद आठवतो? महाप्रचंड संपत्तीने भरलेली त्यांची कोठारं? त्यांच्या कडेकोट सुरक्षेसाठीची अद्ययावत यंत्रणा? एकीकडे भवसागर तरुण जाण्यासाठीचा उपदेश करत भक्तांना हात उंचावून अभय देणारी ही मंडळी… आणि त्यांच्या मनात त्यांच्यावर कुणी हल्ला करेल याच भय?
स्वतःला देवाचे अवतार किंवा दूत समजणाऱ्या या मंडळींच्या अदभुत दैवी शक्तीचं आकर्षण वाटुन भले भले शास्त्रज्ञ, राजकारणी, डॉक्टर, न्यायाधीश यांना शरण जातात! मग अनेकानेक कारणांनी व्यग्र, ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या सामान्य माणसांविषयी काय बोलावं! ते तर कर्ज काढून, कधी कधी बाय-मुलींना यांच्याकडे सेवेला पाठवून देतात. कधी अल्पवयीन मुलांना त्यांच्या आश्रमात ठेवून देतात. केवढी फसवणूक त्यांच्या पदरी येते! इथेच आपल्या मेंदूला गंज चढू न देता कामाला लावण्याची गरज आहे. स्वतःचा विचार करू या, प्रश्न विचारूया. आपलं हे सामर्थ्य जागं होऊ नये यासाठीच चमत्कारांतून, शब्द्जंजाळातून, निरर्थक कर्मकांडातुन खोट्या आश्वासनांतून एक प्रकारची बधिरता आणणारी गुंगी, या मंडळीचं "अध्यात्म" आपल्यावर पांघरून ठेवते. हेच खोटे आधार तपासून बघायला हवे आहेत.
अशा प्रकारच्या विविध भुलवणाऱ्या वाटेनं जाऊन पास्तावलेले, हरवलेले अनेकजण असतात. पण खरं कुणी कुणाशी बोलायचं? आधी स्वतःच स्वतःशी खरं बोलायला हवं. फसलेले सगळेच सांगत असतात की, "मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर खूप गार गार वाटतं!" तिथला विंचू डसल्याचं कोण बोलणार? त्यापेक्षा अशी फसगत झालेल्या किंवा चुकलेल्या काहीजणांनी तरी एकत्र यायला हवं. आपापले प्रश्न, संकट, दुखः याबाबत एखाद्या स्व-मदत गटासारखे ते एकमेकांना भेटून, बोलून चर्चा करायला लागले तर त्यांची मनं मोकळी होतील. फसवणुकीच्या धक्क्यातून त्यांना सावरायला मदत होईल. शेवटी अन्न-वस्त्र काय, वस्तू काय, दुसऱ्याकडून उसन्या घेऊन किती दिवस पुरणार? स्वतःच म्हणून काही मिळवायलाच लागतं. यासाठी आपणच आपला आधार शोधणं, उभं राहणं, सहप्रवाशांचे हात हाती घेत वाटचाल करणं आणि सत्याला, वास्तवाला सामोरं जाणं हेच हिताचं आहे. तो देव बिचारा काही करू शकत नाही आपल्यासाठी, हे एकदा मान्य केलं तरचं आपल्याला पर्याय शोधता येतील.
मला कल्पना आहे की माझी कुणालाही दुखवायची मुळीसुद्धा इच्छा नसली तरी या संवादप्रयत्नामुळे काहीजण दुखावले जातील. आजकाल माणसं फार हळवी झाली आहेत! ती अशावेळी हिंसक, आक्रमक होतात. माझी विनंती एवढीच, की लठ्याकाठ्यांची वापराऐवजी विचार करा… संवाद करा.
very nice article
ReplyDeletevery nice article
ReplyDelete