Friday, June 14, 2013

Marathi Article: वास्तुशास्त्राचा पंचनामा

(लेखक: सदानंद उकिडवे)

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे. वास्तुशास्त्रद्यांनी सामान्यजनांच्या या भाबडेपणाचा फायदा घेतला आहे.

Vastu Shastra

एका वास्तुशास्त्र ज्योतिषाला कुणीतरी विचारले --
"पेशावाईची भरभराट का झाली?"
"शनिवार वाड्याचे तोंड उत्तरेकडे होते म्हणून!"
"मग पेशवाई का बुडाली?"
"वाड्यात जाताना तोंड दक्षिणेला होत होते म्हणून!"

वास्तुशास्त्रातले शास्त्र काय आहे हे स्पष्ट करणारा हा संवाद आहे. गेल्या ३०-४० वर्षात वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाठ पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपाणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत.

वास्तूमध्ये जे बदल करणे शक्य नसते असे बदल करायला सांगणे, घराची मूळ मांडणीच वास्तुशास्त्राला धरून नसल्याने त्या घरात विविध समस्या निर्माण होत आहेत अशी भीती घालणे अशा उपायांनी हे वास्तुशात्राचे प्रणेते आपल्या धंद्याचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यामुळेच ठेच जरी लागली तरी त्याला वास्तुच कारणीभूत असल्याचा कांगावा केला जात आहे.

साधारणपणे १९७० च्या आसपास मुंबई-पुण्यातील जुन्या चाळी आणि वाडे पाडून त्याठिकाणी ओनरशिप फ़्ल्यट बांधण्याच्या कामास वेग आला. गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा व्यवसाय फ़ोफ़वला. त्याकाळी घरबांधणीसाठी सुलभपणे कर्ज मिळत नव्हते आणि आजच्यासारखी गृहबांधणी व्यवसायाला भरभराट आलेली नव्हती. त्यामुळे बिल्डर लोकांनी मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी प्रभावी विक्रिकौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने वास्तुशात्राची नवी आयडिया काही लोकांच्या डोक्यातून बाहेर पडली आणि "वास्तुशास्त्रानुसार सदनिका" अशा जाहिरातींचे पेव फ़ुटले.

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे आणि त्यामुळे आपल्या निवासस्थानाचा उपयोग आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी होऊ शकतो ह्या भाबड्या समजुतीला ह्या शास्त्राने पाणी घातले. बिल्डर लोकांनी सामान्यजनांच्या ह्या भाबडेपणाच्या पुरेपूर फायदा घेतला आणि वास्तुशास्त्रज्ञांची एक नवी पलटण या क्षेत्रात उतरली.

याच चाणाक्ष लोकांनी बांधलेल्या घरातील "दोष" शोधायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे सापळा रचून प्राचीन शास्त्र, पुराणे, पुरातन मंदिरे, रामायण-महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथातले दाखले देऊन भोळ्या लीकांच्या श्रद्धेच्या आधारे आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. अध्यात्म, मानसशास्त्र, पुराणातील भाकडकथा, जोतिषशास्त्र अशा सर्व साधनांची आपल्या मनाप्रमाणे मोडतोड करून आधुनिक वास्तुशास्त्र निर्माण करण्यात आले. शास्त्र म्हटले की नियम आले. कार्यकारण संबंध आला. माती, पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व या सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, उष्ण-शीत कटिबंध, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थळ, काळ, हवामान परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार ह्या शस्त्राने केला पाहीजे. परंतु आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही. बऱ्याच वेळेला घर बांधणारा मालक इंजिनिअरचा सल्ला बाजूला ठेवून वास्तुशास्त्रज्ञाच्या मताला प्राधान्य देतो. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासापेक्षा या पारंपारिक ज्योतिषांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाते.

काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. पण ते फक्त महाल, राजवाडे, प्रासाद, मंदिरे, उद्याने यांच्याच संदर्भात आहेत. वास्तुज्योतीषी अशा गोष्टींचे आपल्या पुस्तकात मोठे भांडवल करतात. परंतु त्या शास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तू आज अस्तित्वात नाहीत. ह्या माहितीत वस्तुस्थितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वास्तुशिल्पे, मंदिरे आज दिसतात. परंतु त्यांचा इतिहास गेल्या हजार-बाराशे वर्षाइतकांच आहे. अनेक भग्न मंदिरे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत असेही नाही. विश्वकर्मा हा "आद्यवास्तुविशारद" मानला जातो. परंतु त्याला पुराणाशिवाय कोणताही आधार नाही. इजिप्तच्या "इम होतेप" याने आच्श्रयकारक वास्तुनिर्मिती केली. पाच हजार वर्षापूर्वीच्या या वास्तू आजही पहावयास मिळतात. मोहेंजोदाडो-हडप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. परंतु या वास्तुशास्त्राचा कोणताही मागोवा न घेता आज जे वास्तुज्योतिषी या शास्त्राच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख करत आहेत तो केवळ आपमतलबी आणि स्वार्थप्रेरक आहे असेच म्हणावे लागेल.

धरणीमाता अन्न, वस्त्र, निवारा देते. ती कुणातही भेदभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना कृमि, किटक, जंतू आणि प्राणी यांची अकारण हत्या होते. काही प्राणी निराधार होतात. कुदळीचे घाव घालून आपण त्या मातेला उपद्रव देतो. त्या कृतीचे पापक्षालन म्हणून आपण त्या स्थानी भूमिपूजन करतो. वास्तुशांती करतो. आग्नेयाला अग्नी प्रज्वलित करणे इत्यादी धार्मिक कार्ये श्रध्दापूर्वक करतो आणि नंतर त्या वास्तूत आनंदाने राहावयास जातो. हीच आपली खरी प्राचीन परंपरा. परंतु वास्तुशास्त्र नावाचे आधुनिक शास्त्र "शोधून" त्याच्या आधारे नवीन वास्तू बांधली नाही तर आपले वाटोळे होईल असा किडा एकदा डोक्यात वळवळू लागला की शास्त्र संपते आणि भ्रम सुरु होतो.

वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे एक मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात प्रचंड पैसा दडलेला आहे. फलज्योतिषी, हस्तसामुद्रिकया क्षेत्रात घुसले. मंगळ वक्री आहे म्हणून समस्या निर्माण होत आहेत असे म्हणण्याऐवजी घराचा संडास ईशान्येला आहे म्हणून समस्या निर्माण आहेत असे म्हटले जावू लागले. वृत्तपत्र आणि टीव्हीवर जाहिरात करून, मेळावे घेऊन लोकांना ह्या शास्त्राच्या जाळ्यात ओढले जावू लागले. फलज्योतिषाला विचारले जाणारे प्रश्नच वास्तुज्योतीषाला विचारले जावू लागले आणि या वास्तुज्योतिषांना घबाडयोग साधला.

सामान्यपणे मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे मुलाला नोकरी नाही, मुलामुलींची लग्ने जुळत नाहीत, नवरा-बायकोचे पटत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, आजारपण सुटत नाही इत्यादी. कर्ज, विवंचना, व्यसनाधिनता, धंद्यामध्ये नुकसान आणि आयुष्यातले अपयश, मिळकत आणि खर्चात तफावत, यश मिळत नाही, इस्टेटीसाठी भाऊबंधकी अशा असंख्य कारणांमुळे माणसे बेजार असतात. कोणी करणी केली आहे, कुणाची नजर लागली आहे अशा सतत संशयाने ते पछाड्लेले असतात. एका मानसिक भीतीच्या दडपणाखाली ते वावरत असतात. अशा वेळी घराची मांडणी वास्तुशास्त्राला धरुन नसल्यानेच या समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सांगितले तर त्यांचा त्यावर सहज विश्वास बसतो. या मानसिकतेचा कौशल्याने उपयोग करुन त्यावर भरभक्कम मोबदला घेतला जातो. शयनगृहाची जागा बदला, बैठकीचे ठिकाण बदला, पाण्याची टाकी दुसरीकडे हलवा अशा असंख्य सुचना केल्या जातात. एकदा या शास्त्राचा मनावर पगडा बसला की येणारे कोणतेही संकट वास्तूदोषामुळे येते असा समज बळावतो. त्यातूनच लोक आपले मानसिक संतुलन घालवून बसतात. एखाद्या अधिक कमकुवत मनाच्या व्यक्तीचे आयुष्यही त्यामुळे बरबाद होवून जाते.

वास्तुशास्त्र उर्फ वास्तुज्योतीषाचे आज पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. हे शास्त्र आता लोकांच्या पैशावर चांगलेच भरभराटीला आले आहे. पैसा दिला तर दोष लगेच नाहीसा होतो. जाहिरात करून मूर्ख व अज्ञानी लोकांना कसे फसवावे हे शास्त्र चांगले विकसित झाले आहे. मी अमक्या वास्तुज्योतीषाचे मार्गदर्शन घेतल्यामुळे माझा तमका फायदा झाला असे सांगणारे अनेकजण ह्या जाहिरातबाजीच्या विळख्यात अडकले आहेत. याचा आधार अमक्या पुराणात आहे असे नुसते सांगावयाचा अवकाश, श्रद्धावान भाविकांची डोळे झाकून, बुद्धी गहाण टाकून तिकडे मेंढरासारखी धावाधाव सुरु होते.

काही ठिकाणी तोडफोड करणे शक्य नसते त्यामुळे लोक तोडफोड करुन मोठ्या खर्चात पडायला तयार होत नाहीत. यांवरही वास्तुज्योतीष्यांकडे फर्मास उपाय आहेत. वास्तुदोष घालवण्यासाठी मंत्रांनी सिद्द्ध केलेली यंत्रे, रत्ने, माळा, फोटो, पादुका, घंटा, बासऱ्या, नाग, करंडे, झाडांची मुळी, त्रिशूळ असे असंख्य उपाय हजर असतात. हे किमती तोडगे खास तुमच्यासाठी नाममात्र किमतीला देऊ करणारे काही महापरोपकारी वास्तुज्योतिषीही आहेत. ऑपरेशन न करता केवळ मंत्र म्हणून अपेंडिक्स बरा होऊ शकतो. पण श्रद्धा नसेल तर मात्र का गुण येणार नाही असे म्हणणाऱ्या मांत्रिकासारखाच हा प्रकार असतो.

वास्तुशास्त्राचा गाभा म्हणजे अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी! पुराणकर्त्यांनी एक एक दिशेला एक एक स्वामी नेमला आहे. ह्या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात. प्रमाद घडला तर उपद्रव करतात. दिशा हि संकल्पनाच वास्तुशास्त्राने शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट केलेली नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ती टिकू शकत नाही. पृथ्वी स्थिर आहे अशा गृहीतावरच हे आधारित आहे. सुर्य, चंद्र, गृह, तारे, ब्रह्मांड यांची गती व पृथ्वीची स्वतःची गती ही संकल्पनाच विचारात घेतली जात नाही. दिशा ही सापेक्ष आहे. ती कुठल्याच गोष्टीचे कारण असू शकत नाही आणि त्यामुळे ह्या दिश्यांच्यावर आधारलेले शास्त्र वैज्ञानीक निकषावर टिकू शकत नाही. ऊर्ध्व आणि अधो ह्या दोन दिशाही वास्तुज्योतीषी विचारात घेत नाहीत. त्यामुळेच दिशा हि संकल्पनाच ह्या क्षेत्राला पेलवलेली नाही हे स्पष्ट होते.

वास्तुपुरुष हि प्राचीन संकल्पनाही अशीच विवादास्पद आहे. पुराणात ह्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्यानुसार वास्तुपुरुष म्हणजे -

१. शंकराच्या घामापासून निर्माण झालेले भूत
२. वास्तोष्पति नामक प्राचीन वैदिक देवता
३. छगासुर नावाचा राक्षस
४. पृथ्वी आणि आकाश यांना रोखणारे महाभूत

या सर्वांना वास्तुपुरुष असे म्हटले जाते. या वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने असे वरदान दिले की पृथ्वीवरील लोक वास्तु निर्माण केल्यानंतर तुझी पूजा करतील व तुला बलीभाग अर्पण करतील. त्यांनी असे न केल्यास त्या घरातील व्यक्ती, धनधान्य आणि समाधान या सर्वांना तू खाऊन टाक. कोणत्या धर्मात असा लोकांना खाऊन टाकणारा देव असेल? वास्तुशात्र हे मुख्यतः पुराणे व पुराणांचेच सहोदर असणारे "समरांगण सूत्रधार" आणि "मनसार" या ग्रंथांवर आधारित आहे. अशी पुराणे कोणत्याही शास्त्राचे प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाहीत. त्यांच्यातील विसंगती, भिन्न विचार आणि विज्ञानाच्या पायावर न टिकणारी गृहिते, कर्मकांडांचा अतिरेक यामुळे शास्त्रापेक्षा धर्माला विकृत स्वरूप देण्याचेच कार्य त्यांनी केले आहे. विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये स्वीकारलेला बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशक्ती यांच्या आधारावरच या वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो व याठिकाणी ते शास्त्र मानवी संशयाचे निराकरण करण्यास पूर्णपणे अपुरे ठरते.

वास्तुशास्त्राचा एवढा प्रचंड हलकल्लोळ माजल्यानंतर आणि या क्षेत्रात अनेक नवनवे अभ्यासू तज्ञ उतरल्यानंतरही या क्षेत्राचे अनभिज्ञपण कमी होत नाही. तरीही मानवी स्वभावाला अगम्य गोष्टींचे असणारे आकर्षण आणि अज्ञाताची ओढ यामुळे या वास्तुशास्त्राच्या अभ्यासाची गोडी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. श्रद्धावान माणसांनी त्याचे परिशीलन करण्यास हरकत नाही. परंतु वास्तुशास्त्राच्या एका अभ्यासकाने आपल्या पुस्तकात दिलेला हा इशारा मात्र लक्षात ठेवावा असा आहे --
या पुस्तकातील उपाय, तोडगे करुन पहावेत. फरक न पडल्यास लेखक जबाबदार राहणार नाहीत. पडणाऱ्या अगर न पडणाऱ्या फरकाचा दावा लेखक उचलत नाही. 
या वक्तव्याला कोणत्या भाष्याची गरज आहे काय?


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment