
ड्रायव्हर म्हणाला, "प्रत्यक्षात तुमचा पत्ता १० डॉलरच्याच अंतराचा आहे. मला नीट माहित नसल्यामुळे एका चौकातून वळावे लागले. माझ्या चूकीमुळे वाढलेल्या भाडयाचा भुर्दंड मी प्रवाशाला बसू देणार नाही. मी असे वागलो तर माझ्या देशाची प्रतिमा खराब होईल. मग तुम्ही माझ्या देशाबद्दल दुसरीकडे कोणता संदेश द्याल?"
आपल्या देशाबद्दल सामान्य टॅक्सी ड्रायव्हरचा हा अभिमान पाहून भारतीयाला गहीवर आला. आपल्याकडे गोऱ्या कातडीचे परदेशी पर्यटक आणि त्यांच्यापुढे मोठमोठ्या शहरात, पर्यटन स्थळावर घोंगावणारी व्यापारी व फेरीवाल्यांची टोळी बघताना आपल्या देशाबद्दल हे लोक काय विचार करत असतील असे वाटू लागते.
आपल्या देशात सिव्हील सेन्स तर सोडाच पण देशाबद्दलचा अभिमानपण कमी होत आहे? भ्रष्टाचारी राजकारणी, त्यांचे गुन्हेगार आणि बिल्डरांशी सख्य आणि त्यातून निवडणुकीपासून होणारी सुरवात आणि त्याचे पार्लमेंट हाऊसमध्ये होणारे ओंगळ प्रदर्शन हे सर्व गृहीत धरूनही जिथे शक्य आहे तिथे देशाभिमान आणि संस्कृतीचे प्रदर्शन आपण का बरे नाही करू शकत? किती दिवस आपल्या प्राचीन थोर संस्कृतीच्या वारशाचे ढोल आपण बडवायचे? जुन्या गढीवरील आणि बुरुजावरील हि पूर्वजांची भूते आम्हाला असे वागायला का नाही शिकवत?
मधल्या काळात ब्रिटिशानी लावलेली शिस्त बरी होती म्हणण्याइतकी आपली लोकशाही बेबंदशाही व्हावी आणि आपली घटना मोठ्या विचारपूर्वक बनविणाऱ्या घटनाकारांना ' हेचि फळ काय मम तपाला ' वाटण्याइतके का आपण मुजोर होत चाललो आहोत? स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार घेऊन इतरांच्या लुटीवरच आमचे पोट भरणार काय? दुसऱ्याची जमीन लाटायची, सरकारी भूखंड गिळायचे, आरक्षणे बदलायची, खाणीचे, दगडांचे, वाळूचे ठेके घेताना एका ट्रकची रॉयलटी भरून शेकडो टन खनिज लाटायचे हीच का आमची रॉयलटी?
मग अशा बेबंदाना मुसक्या बांधू पाहणाऱ्या नरेंद्रकुमारांवर ट्रक्टर घालणारे कोणाच्या वरदहस्ताने शिरजोर होत आहेत? नोटा फेकून कामे होताना पाहून प्रशासनात दाखल झालेली तरुण मूलेदेखील आपल्याला याच यंत्रणेचा भाग बनायचे आहे कि काय असा प्रश्न विचारू लागली आहेत. मग त्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या प्रशासकाला "गडचिरोली"ची अंदमानची कोठडी किंवा प्रशिक्षणाच्या कामाला जुंपण्याचे तंत्र कोणी विकसित केले? मग हीच परिस्थिती राहणार असेल तर "देवळात टाळ आणि बाहेर कुटाळ" असाच प्रकार म्हणायचा. मोठमोठ्या प्रवचन, कीर्तन सप्ताहांना देणग्या देणारेही आता याच मार्गातील कमाई लावत असतील तर त्या भजनातून सूर येणार का असुर? त्या पैशाला जो वास येणार तो देखील अपादधर्म समजून मुग गिळून गप्प बसायचे?
हे चित्र भयावह वाटते. पण निष्पापपणे देशाच्या वेगवेगळ्या सेवेत जाऊन आपल्या मातृभूमीची सेवा करू इच्छिणाऱ्यानी विद्यार्थ्यांना आपण कोणते धडे देणार याचा सर्वांनी विचार करावा. चांगले वागून, कायदा पाळून, कष्ट करून, कोणालाही न लुबाडता, कोणाची फसवणूक न करता, कोणाला टोपी न घालता देखील जीवन जगता येते. इतकेच नव्हे तर त्या जीवनाचा आनंद वेगळा असतो हे कळायला हवे. शेवटी अलेक्झांडरने जग जिंकूनही मरताना आपल्या मृत्यूनंतर आपले हात तिरडीच्या बाहेर काढायला सांगितले होते. ते जगाला कळावे म्हणून की "मी माझ्याबरोबर कांहीच नेऊ शकलो नाही."
No comments:
Post a Comment