Thursday, July 11, 2013

Marathi Article: निरीश्वरवाद आणि ईश्वर

(लेखक: विनायक पलुस्कर)

अनेक अतर्क्य घटना, उपाय नसलेली असुरक्षितता, अकल्पितपणे उध्वस्त करणारी दुःखे, सारे सुरळीत चालू असताना नियतीनामक शक्तीचे बसणारे असह्य फटके व विज्ञानाच्या आवाक्यात अद्याप न आलेला, कधीही येऊ शकणारा मृत्यू ह्या गूढ रसायनाने भरून गेलेली ती पोकळी "तू एक असहाय्य बाहुले आहेस" असे सतत मानवाला बजावत असते. ही पोकळी भरून काढण्याकरिता माणसाने ईश्वराची निर्मिती केली आहे. या सर्व अज्ञात, अगम्य व गूढ भयाचा भार त्याने त्याच्यावर टाकला.

Atheist and Existence of God

आजच्या विज्ञानयुगाची सुरुवात इसवीसनाच्या प्रथम सहस्त्रकातच झाली. पण मागील तीन शतकात विज्ञान अतिशय प्रगत झाले, नवे शोध लागत गेले, विजेचा शोध लागल्यावर अगम्य अंधारातील भुते-खेते अंतर्धान पावली. देवी, प्लेग, कॉलरा, पोलिओ इत्यादी भयंकर रोगामागाची करणे समजल्यानंतर त्यामागच्या अंधश्रद्धा संपुष्टात आल्या. ग्रहणे, धुमकेतू यांचे विज्ञान समजल्यावर त्यांची भीती संपू लागली. छपाई तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अक्षरज्ञान प्राप्त झाले.

आजची पिढी टीव्ही, कॉम्पुटर, मोबाईल, प्रवास यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगत झाली. असे वाटले की आता अंधश्रद्धा, देवदेवता मागे पडतील. पण असे दिसते की आधुनिक विज्ञानाने शहाणी झालेली ही नवमतवादी पिढीसुद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटलेली नाही. नवी पिढी प्रचंड संख्येने देव देव करते. सर्व देवळे, तीर्थेक्षेत्रे गर्दीने खचाखच भरलेली असतात. या नव्या पिढीतले आधुनिक तरुण अनेक ठिकाणी देवासाठी केशवपन करतात. अंत्यविधी, काकस्पर्शासारखे विधी, श्राद्धे अत्यंत भाविकपणे करतात. सर्व रूढी व परंपरा अत्यंत निष्ठेने पार पाडतात. सण, व्रत, धार्मिक विधी व त्यातील सर्व अवडंबर अगदी पूर्वीच्या काळाची आठवण व्हावी अशा पद्धतीने साजरे करतात. हे नेमके काय आहे? ही मानसिकता कशामुळे आहे?

यासाठी थोडा मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. मानवी मेंदू ही अजूनही अगम्य अशी चीज आहे. ९०% मेंदूचे कार्य अज्ञात आहे. पण मानवी व्यवहारांच्या अभ्यासावरून असे दिसते की मानव हा सतत भूतकाळाची समीक्षा करत असतो. त्यात माहितीच्या व ज्ञानाच्या थप्प्या मेंदूच्या कप्प्यात शिस्तबद्ध पद्धतीने रचत असतो. वर्तमानकाळातील प्रत्येक घटना त्या संचित ज्ञानाच्या निकषावर तपासात असतो व त्यातले बदल स्वीकारत भविष्यकाळाची जोडणी करत असतो. भूतकाळातील घटनांची नोंदवून ठेवलेली भीती, त्यामागची कारणमीमांसा कळल्यावर झटकून टाकतो. कप्पे वारंवार स्वच्छ करतो, नव्या नोंदी त्यात भरतो. पण त्याचवेळी त्याच्या मेंदूच्या मोठ्या भागात एक मनाला सतत भेडसावणारी अगम्य पोकळी त्याला छळत असते. अनेक अतर्क्य घटना, उपाय नसलेली असुरक्षितता, अकल्पितपणे उध्वस्त करणारी दुःखे, सारे सुरळीत चालू असताना नियतीनामक शक्तीचे बसणारे असह्य फटके व विज्ञानाच्या आवाक्यात अद्याप न आलेला, कधीही येऊ शकणारा मृत्यू ह्या गूढ रसायनाने भरून गेलेली ती पोकळी "तू एक असहाय्य बाहुले आहेस" असे सतत मानवाला बजावत असते.

ही पोकळी भरून काढण्याकरिता माणसाने ईश्वराची निर्मिती केली आहे. या सर्व अज्ञात, अगम्य व गूढ भयाचा भार त्याने त्याच्यावर टाकला. सर्व धर्मांनी मनुष्याचा हाच कमकुवतपणा जोखला व त्याला "ईश्वर आहे, तो तुला संकटातून तारेल, तुझ्या सर्व कर्मांचा भार त्याच्यावर सोपव व निर्धास्त राहा" असा संदेश देऊन आपापला धर्म वाढवला. जेव्हा जेव्हा मानवजातीवर संकट आले व सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेंव्हा मानवाने ईश्वराचे ओझे मनावरून उतरून ठेवून स्वकर्तुत्वाने पुन्हा पुन्हा भरारी घेतली असा इतिहास आहे. जेव्हा मानवी अस्तित्वावरच घाला येतो तेंव्हा ईश्वर ही संकल्पना कुचकामी आहे हे लक्षात येते. जीवनसंघर्ष तीव्र होतो तेंव्हा टिकून राहण्याचा प्रयत्न करताना त्याला ईश्वराचा विचार करण्यास वेळ नसतो, परंतु ह्या संघर्षात टिकून राहण्याची मानसिक शक्ती मिळवण्यासाठी एक आधार म्हणून तो ईश्वराला निर्माण करतो.

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्ध व महावीरांच्या तत्वज्ञानामुळे कर्मकांडे व मूर्तीपूजा यांचे स्तोम कमी झाले. ईश्वर या संकल्पनेवरच लोकांचा विश्वास उडाला व देहवाद महत्वाचा ठरल्याने लोकायत तत्वज्ञान लोकप्रिय झाले. ईश्वराला कायमचे हद्दपार करण्यासाठी तेंव्हा निरीश्वरवाद्यांना संधी मिळाली होती. पण लोकायत किंवा बौद्ध तसेच महावीरांचे निरीश्वर तत्वज्ञान मानवी मनाची पोकळी समजून घेण्यास पुरेसे समर्थ ठरले नाही. त्याचवेळी जर सजग विज्ञानाचा अभ्यास व तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया निरीश्वरवाद्यांनी राबवली असती व मानवाची आंतरिक शक्ती वाढवण्याचा सर्वसामान्य उपाय शोधून मनाची ही पोकळी भरून काढली असती तर पुढच्या काळात ईश्वराची गरजच उरली नसती. पण तसे झाले नाही! लोकायतांचा देहवाद अल्पकाळातच शिळा झाला. बौद्ध तत्वज्ञानाचा उदास सूर सतत दुखः विसरून पुन्हा जीवनाचा आनंद उपभोगण्याची मुलभुत कामना ठेवणाऱ्या मानवाला फार काळ भावला नाही. जैनधर्माचे निष्कर्म तत्वज्ञान सतत कर्म करणाऱ्या माणसाला सर्वकाळ पटणारे नव्हते.

याचवेळी हिंदू धर्माने मात्र पुराणाद्वारे देहवाद, भोगवाद हेही स्वीकारले आणि प्रत्येकाला आचारस्वातंत्र्य, दैवतपुजा स्वातंत्र्य बहाल केले. त्याचवेळी पाप-पुण्याची भीतीही घातली. त्यावर प्रायच्श्रीत्ये सांगितली. दान-धर्म, व्रत-वैकल्ये इत्यादी पुण्य देणारी साधनेही त्याच्या गळ्यात उतरवली. त्यातूनच निसर्गातला ईश्वर मुर्तीतल्या परमेश्वरात विलीन झाला. हे कमी आहे म्हणून की काय देवांचे अवतार, गुरु परंपरा आणि अध्यात्मिक दैवतश्रेणी सुरु झाली. या गुरुंमध्ये काही परमेश्वराचा अंश असतो तर काहींना स्वतःच परमेश्वराचे पूर्णावतार असल्याचा गंड तयार होतो. या महात्म्यांचे शिष्य त्यांना आपल्या भक्तिभावाने परमेश्वराच्या कोटीला नेऊन ठेवतात. हा गुरु बनण्याचा किंवा बनवण्याचा मार्ग म्हणजे आधुनिक काळातील अंधश्रद्धेचे उगमस्थान!

आजचे विज्ञानयुग या मानसिकतेवर तोडगा काढू शकेल काय? विज्ञानापाशी ही क्षमता नक्कीच आहे पण विज्ञान स्वतःच्याच नियमांनी बंधित आहे. न्युटनचे नियम, आइनस्टाईनचे सिद्धांत, आणि त्यानंतरचे गॉड पार्टीकलसारखे शोध यातूनही अंतिम ज्ञानाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचल्याचे जाणवत नाही. प्रत्येक सिद्धांत गणिताने व भौतिक नियमांनी सिद्ध झाला तरच तो सिद्धांत विज्ञान स्वीकारते. विज्ञान काहीच नाकारत नाही, अगदी ईश्वरसुद्धा! पण तो सिद्ध झाला पाहिजे ही सुद्धा विज्ञानाचीच अट आहे. आज ना उद्या या सर्व विश्वाचे आणि विश्वनिर्मितीचे रहस्य शोधून काढता येईल या आशेने विज्ञान वाटचाल करीत आहे.

एकूण काय? ईश्वराचा परमेश्वर झाला. हा महान परमेश्वर दिवसेंदिवस अतिमहान होत जाण्याची चिन्हे आहेत. मी हे लिहितोय खरा पण माझ्याही मनाच्या पोकळीला ईश्वर व्यापून राहिला आहे हे निश्चित. आज माझ्याही समोर ईश्वराला मानण्याखेरीज अन्य पर्याय नाही. ईश्वराचे अस्तित्व ठामपणे नाकारणाऱ्या निरीश्वरवाद्यांना मी महामानवच समजतो. पण त्यांचा हा ठामपणा वैयक्तिक पातळीवरच राहतो. त्याचा समाजमनावर किंचितही परिणाम जाणवत नाही. त्यामुळे मनात पटकन विचार येतो, ईश्वराला संपवण्याची इतिहासाने निरीश्वरवाद्यांना अनेकवेळा संधी दिली पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

परमेश्वरा मला क्षमा कर रे बाबा!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment