Monday, July 1, 2013

Marathi Article: अंगात का येते?

(लेखक: डॉ. प्रकाश पंगू)

अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे "स्वयंभू" किंवा "जागृत" मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या "अंगात" येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते. हे अंगात येणे म्हणजे नेमके काय असते?

अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा देवाच्या, देवीच्या आरतीच्या वेळी, पालखीच्या वेळी घडताना दिसतो. ज्या बाईच्या अंगात येते ती सुरुवातीला स्तब्ध होते, डोळे जडावल्यासारखे होतात. डोके व शरीराचा वरचा भाग हळूहळू फिरायला लागतो. हात आपोआप उचलले जातात. तोंडातून ह्युं S S ह्युं S S असा आवाज यायला लागतो. थोडयाच वेळात या सर्व हालचालींचा वेग वाढतो. त्या स्त्रीच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटतो. त्यातच इतर स्त्रिया पुढे जाऊन तिचा घाबरत घाबरत मळवट भरतात, नमस्कार करून बाजूला होतात. लहान मुले "तो" अवतार बघून घाबरून जातात.

आता त्या बाईच्या अंगात आलेल्या देवीने तिचा चांगलाच ताबा घेतलेला असतो. घुमण्याचा आणि हुंकाराचा सूर टिपेला जातो. देवी आता सर्व उपस्थित भक्तसमुदायाला कडक शब्दात सूचना देऊ लागते. आपला प्रकोप का झाला तेही असंबद्ध भाषेत सांगू लागते. पालखी झाली, शेजारती झाली की अंगात आलेली देवी हळूहळू बाहेर पडते. ती बाई शुद्धीवर येते तेंव्हा तिला आपण काय केले तेही आठवत नाही. तिच्या अंगात काही काळ का होईना पण देवी येते त्याचा अर्थ ती बाई अध्यात्मिक द्रुष्ट्या इतरांपेक्षा उच्च दर्जाची असल्याचाच निर्वाळा मानला जातो. अशा बाईच्या बाबतीत मग अंगात येण्याच्या प्रकाराची सतत पुनरावृत्ती होताना दिसते.

हा प्रकार नेमका काय आहे? याचा खुलासा पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने करता येईल काय? ही काही अज्ञात, गूढ शास्त्र यामागे लपले आहे? अनेकजणांचे या संदर्भातले अनुभव वेगवेगळे आहेत. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींचा खुलासा करता येणार नाही अशा गोष्टीही यात असतात. उदाहरणार्थ एका अंगात आलेल्या बाईची प्रकृती इतकी अशक्त, दुबळी होती की तिला धड उभेही राहता येत नव्हते. अशा बाईने दोन-दोन, तीन-तीन तास मोठमोठ्याने हुंकार देत, शरीराची वेगवान हलचाल करत देवीचे कडक इशारे सुनवावेत हे कसे शक्य आहे? काही अडाणी बायकांच्या अंगात येते आणि त्या पुर्णपणे परक्या भाषेत बोलायला लागतात, हे कसे?

अंगात आलेली बाई दहा-दहा जणांना आवरत नाही हे कसे होते हा सुद्धा नेहमी पडणारा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे एखादया गुळगुळीत खांबावर सरसर चढून जाणारी "झपाटलेली" बाई हेसुद्धा लोकांच्या आच्शर्याचे विषय आहेत. आणि या गोष्टींचा खुलासा विज्ञान करू शकणार नाही असे अनेकजणांना वाटते. आमावस्या किंवा पोर्णिमा अशाच दिवशी अंगात का येते या ही प्रश्नाचे उत्तर विज्ञानाला देता येणार नाही असा त्यांचा समज असतो.

या सर्व शंका, समज-गैरसमजाचे निराकरण करून "अंगात येणे" या कृतीचा शास्त्रीय अन्वयार्थ लावता येतो हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळेच अशा संकल्पनांना बळ मिळाले आहे. जसाजसा मनाची शक्ती, मनाचे व्यापार यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास वाढू लागला तसतशा या वेडगळ समजुतीमागील शास्त्रीय तथ्ये उलगडू लागली आहेत.

यात पहिली लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे अंगात येण्याचा हा प्रकार बायकांच्याच बाबतीत घडतो. तरुण व पोक्त स्त्रियांच्या बाबतीत बहुदा हे घडते. लहान मुली, वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत नव्हे. याचे कारण असे की मनावरचे ताण, चिंता व यातून बाहेर पडण्याची तीव्र पण अबोध इच्छाच त्या व्यक्तीला पछाडत असते. शिवाय स्त्रियांवर पारंपारिक मतांचा, संस्काराचा पगडा जास्त असतो. आपल्या विचारांना वाट करून देऊन मोकळेपणाने बोलण्याचीही त्यांना चोरी असते. अशा सर्व कारणांमुळे अंगात येण्याचे प्रकार बायकांच्याच बाबतीत घडताना दिसतात.

अंगात येणे या प्रकारचे तसेच यातील शारीरिक व मानसिक प्रक्रियेचे अधिक विश्लेषण करत असताना असे आढळून येते की जरी "भुताने पछाडले", "देवीने ताबा घेणे" असे वर्णन केले तरी ती एक मानसिक कमजोरी असते. यात मुख्यत्वेकरून सौम्य मानसिक आजार व तीव्र मानसिक आजार असे दोन प्रकार असतात. मेंदूतील रासायनिक द्रव्याची कमतरता किंवा वाढ यामुळे मेंदुमार्फत नियंत्रित केल्या जाणाऱ्या क्रिया आणि वर्तनामध्ये बदल होतो. काहीवेळा अशी व्यक्ती भ्रमिष्ट, बेताल होते व यालाच मनोरुग्णावस्था म्हटले जाते.

अंगात येणे हा एक सौम्य प्रकारचा मानसिक आधार आहे. त्याला "न्युरॉसीस" म्हणतात. या अंगात येण्याचेही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अंगात येण्याचे ढोंग. हे अंगात येणे म्हणजे अंगात "आणलेले" असते. येथे अंगात येणे हा धंद्याचा भाग असतो. अशा अंगात आलेल्या व्यक्ती जी मागणी करेल पुरवली जाते, ज्या सूचना करेल त्या पाळल्या जातात व त्यातुन त्या व्यक्तीला आपला किंवा आपल्या माणसांचा स्वार्थ सहजपणे साधता येतो.

दुसऱ्या प्रकारचे अंगात येणे म्हणजे पारंपारिक वर्तन. विशिष्ठ वेळी, विशिष्ठ ठिकाणी अंगात येणे. पौर्णिमेच्या दिवशी, नदीकाठच्या देवळात, गावच्या जत्रेच्या दिवशी, तर काहीवेळा पशुहत्या केली जात असताना त्याचा हा परिणाम असतो. शिवाय आजूबाजूच्या स्त्रिया-पुरुष असे वातावरण तयार करतात की ते पाहून स्त्रीच्या अंगात "देवी" घुमायला लागते. अनेकदा सासू किंवा तशीच एखादी प्रोढ स्त्री आपल्या तरुण सुनेच्या कपाळावर मळवट भरते, बाकीच्या बायकाही त्याचीच पुनरावृत्ती करतात आणि मग ठराविक वेळेला नेहमीच्या सवयीने त्या मुलीच्या अंगात यायला सुरुवात होते. अशावेळी या अंगात आलेल्या बाईला या वातावरणापासून बाजूला नेले, भाविकांची गर्दी हटवली किंवा सरळ त्या बाईला एक थोबाडीत मारून शुद्धीवर आणली तरी ती देवी अंगातून निघून जाते असा अनुभव आहे.

अंगात येण्याचा तिसरा प्रकार आहे भावनिक उद्दीपन आणि स्वयंसंमोहन. काहीवेळा बाह्य परिस्थिती, वातावरण किंवा कोणतीही परंपरा नसतानाही एखादी व्यक्ती स्वतः त्या भ्रमिष्टावस्थेत जाऊ शकते व तिच्या अंगात आल्याचा प्रत्यय इतरांना येऊ शकतो. उदाहरणार्थ नवरात्रात देवीचा मंडप, हिरवागार शालू, लालभडक कुंकू, आणि दैत्यावर त्रिशूळ रोखणाऱ्या देवीच्या मुखवट्यावरिल चमकणारे डोळे, जळणारा, धुर ओकणारा धूप, जोरजोरात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, सर्वत्र दिव्यांचा लखलखाट आणि त्यातच काही बायकांच्या अंगात येउन त्या घुमायला लागल्या की आणखी काही बायकांचे मनही त्या वातावरणाने उद्दीपित होते. त्या भारावलेल्या वातावरणामुळे हे घडते. एखादी स्त्री स्वतःच्याच मनाला संमोहित करते. तिच्या पापण्या जडावत जातात, तिचे अंग ढिले पडते. अशावेळी सर्व इंद्रियांचे उद्दीपन होते आणि हातात हात गुंफून अंबाबाईचं चांगभल हा गजर करणाऱ्या इतर बायकांसारखीच स्वतः ही बाई घुमायला सुरुवात करते.

अंगात येण्याचा चौथा आणि सर्वात गंभीर प्रकार म्हणजे हिस्टेरिया किंवा भ्रमिस्टावस्था. यात मानसिक विघटन महत्वाचे असते. समजा एखादया बाईला लग्नानंतर खूप वर्षे होऊनही मुल होत नाही. घरच्यांची बोलणी खावी लागतात, नवरा दारू प्यायला लागतो व मारतो. चूक बाईची असेच सर्वांना वाटते. अशावेळी त्या बाईला आरती ऐकली, घंटानाद ऐकला की तिची शुद्ध हरपते, केस मोकळे सोडून ती घुमायला लागते. त्यावेळी तिला सासू, शेजारी-पाजारी, नवरा कुणीही त्रास देत नाही. काहीवेळा अंगात देवी आली की शुद्ध हरपल्यासारखी जोरजोरात ओरडते. एरवी सुतासारखी सरळ असली तरी "त्या" वेळी नवऱ्याची अक्षरशः गचांडी धरते. मुळूमुळू रडणारी, कधीही अपशब्द न बोलणारी ही सून अस्खलित शिव्या दयायला लागते! हा तिच्या अबोध मनाने धारण केलेला प्रकट अविष्कार असतो.

या चारही प्रकारच्या अंगात येण्यामागील "शास्त्रीय" कारणे एकदा समजली की त्यावरील उपचार करणे ही फारच सोपी गोष्ट असते. मुख्यतः ह्या सर्व प्रकारात ज्यांचे "हितसंबंध" गुंतलेले असतात त्यांना या "अंगात येणाऱ्या" पासून बाजूला करणे ही पहिली पायरी असते. धंदा म्हणून या सगळ्या प्रकाराचा वापर करणाऱ्यांना आणि मानसिक दडपणामुळे मनोविकाराचा बळी  ठरणाऱ्या बायकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हा महत्वाचा उपाय आहे.

यापुढचा प्रत्यक्ष उपचाराचा भाग म्हणजे तज्ञ वैद्यकीय सल्ला घेणे. त्याऐवजी अनेकजण मांत्रिकाकडे जाणे, भूत उतरविणे अशा उपाययोजनांकडे वळतात. कारण मानसिक आजारावर सामान्य डॉक्टरांकडे उपाय नसतो अशी त्यांची समजूत असते. ताप आला, पोट बिघडले, अपघात झाला अशा गोष्टींसाठी औषध, इंजेक्शन, गोळ्या, ऑपरेशन  हे उपाय असतात. पण एखादा माणूस सारखे डोळे मिचकावतो, तोंडातल्या तोंडात पुटपुटतो, नको तिथे नको ते करतो म्हटलं की त्याचा "स्क्रू" ढिला झाल्याचा आणि औषध, गोळ्या नव्हे तर कोणत्यातरी अदृश्य व दुष्ट शक्तीचा तो बळी असल्याचा निष्कर्ष काढला जातो. डॉक्टर मंडळी अशावेळी नेमका काय रोग झाला आहे ते सांगू शकत नाहीत पण मांत्रिक, साधू, महाराज किंवा बाबा त्या दुष्ट शक्तींकडे अचूक बोट दाखवतात. "मन आजारी पडलं" ही कल्पना फारशी रुचत नाही. पण "दुष्ट शक्तीने मनावर कब्जा केला" हे म्हणणे अगदी पटण्याजोगे असते आणि त्यावर उपाय करायला तज्ञ मांत्रिक केंव्हाही उपलब्ध असतात.

एखाद्या व्यक्तीला भुताने झपाटले आहे  म्हटले की ती व्यक्ती स्वतः दोषी नाही असे आपोआपच सर्वांना पटते.  तुझ्या भ्रमिष्ठ वागण्यात तुझा काहीच दोष नाही, हा देवीचा कोप होता, कुंडलीचा त्रास होता असे  समर्थनही त्या व्यक्तीला बरे वाटते. असे सांगणारा "गुरु" म्हणजे तर आपल्या संस्कृतीचा आधारच असतो. दवाखान्यात "वेटिंग" मध्ये तासंतास बसून ढीगभर फी देऊनही अशा रोगांचा कायमचा नायनाट होईल की नाही अशी शंका असते. त्याऐवजी "भूतबाधा" उतरविण्याची दैवी उपचारपद्धती प्रभावी ठरते. पोथीवाचन, यज्ञकुंड, धीरगंभीर पठण आणि अगम्य भाषेतील मार्गदर्शन याचाच रुग्णाला फार आधार वाटत असतो.

त्यामुळेच अशा मानसिक विकारावरील उपचार हेही मानसिकच असावे लागतात. रुग्णाला आपुलकी, जवळीक, मानसिक आधार याची मुख्य गरज असते. डॉक्टरकडे केल्या जाणाऱ्या उपायांना मर्यादा असतात. उदाहरणार्थ डॉक्टरी उपचारांनी गोवर सात दिवसात बरा होतो व कोणताही उपाय न करता तो आठवडयात बरा होतो असे म्हणतात. याचा अर्थ इतकाच  की गोवर हा हवेतील विषाणूंच्या संसर्गाने होणारा रोग आहे आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जागी झाल्यावरच तो बरा होतो. सातव्या दिवशी जे औषध किंवा जो डॉक्टर त्यावर उपचार करतो त्याला त्याचे श्रेय मिळणार! असंख्य डॉक्टरांकडे उपचार करून कंटाळलेला एखादा रोगी कुणा महाराजाच्या अंगाऱ्यामुळे बरा झाल्याच्या कथा याच प्रकारात मोडत असतात.

एकदा ही रोगमीमांसा झाली की अनेक गूढ बाबींचा उलगडा होऊ लागतो. अंगात देवी संचारली की त्या व्यक्तीला पूर्णपणे अपरिचित "भाषा" बोलता येते हा गैरसमज त्यातूनच तयार होतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती कधीमधी ऐकलेल्या भाषेतलेच काही शब्द बोलत असते. कानडी, संस्कृत, गुजराथी, शब्द कानावर पडलेले असतात तेच तिच्या तोंडी येतात. ही व्यक्ती जर्मन, स्पानिश, इटालियन भाषा का बरे बोलत नाही? दुसरे म्हणजे अंगात आल्यावर इतके बळ येते तेही मानसिकतेचा भाग आहे. परीक्षेच्या वेळी, महत्वाच्या कार्यक्रमावेळी आपण सगळी शारीरिक शक्ती एकवटतो तसाच हा प्रकार असतो हे लक्षात घेतले पाहिजे ही भ्रम झालेली व्यक्ती एका बेभान अवस्थेत झाडावर उंच चढते हे खरे. पण ज्याला प्रशिक्षणाची गरज नाही अशाच गोष्टीच ती व्यक्ती करू शकते. त्यामुळेच अंगात आल्यावर गुळगुळीत खांबावर चढणे, झाडावर चढणे अशी कृत्ये तिला करता येतात. पण पोहणे, सायकल चालवणे याचे जर तिने प्रशिक्षण घेतले नसेल तर अंगात देवीचे कितीही बळ संचारले तरी ती बाई पाण्यात पोहू शकणार नाही, किंवा सायकल चालवू शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे!

"अंगात येणे" या प्रकारातील भ्रामक कल्पनांचा कितीही पर्दाफाश झाला तरी समाजमनावरील त्याची मोहिनी कमी होत नाही. याचे मुख्य कारण असे की त्यावर उपचार करण्याच्या मिषाने धंदा करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आजही समाजात वावरतो. वैद्यकीय क्षेत्रात अनिष्ट प्रवृत्ती बळावल्या आहेत त्याचाही परिणाम म्हणजे अध्यात्मिक विचारांचा फैलाव वाढत आहे. त्यामुळेच शंभर-दीडशे वर्षांपासून बुद्धिप्रामाण्य, वैज्ञानिक चिकित्सा आणि बुद्धिवादाचा झेंडा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन हा विषय अजूनही कोपऱ्यातच आहे. जादूटोणा विरोधी कायदा वर्षानुवर्षे फक्त चर्चेतच आहे. तो मंजूर होऊ शकत नाही. उलट अनेक देवदेवता, जत्रा, यात्रा, उत्सव आणि उरूस यातून देवभोळेपणा वाढत असून परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी असहाय्यपणे देवळापुढे रांगा लावण्याची पराभूत मानसिकता वाढत आहे. हे भूत अंगातून उतरविण्याची मोठी गरज आहे.ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

7 comments:

 1. I was definitely sure about there should be some scientific explanation, I got it today

  ReplyDelete
 2. I was definitely sure about there should be some scientific explanation, I got it today

  ReplyDelete
 3. Nice explanation..... .. Given by you. .. Thank you to tell us the main reason behind it.....

  ReplyDelete
 4. Sir I am very much surprised by such explanation.. I liked the scientific view towards this issue...but still I have few doubts I am searching scientific explanation for that. Could you please help me ? rajeshingle899@gmail.com

  ReplyDelete
 5. You are right
  Thank you

  ReplyDelete