Saturday, July 20, 2013

Marathi Story: भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा - भाग १)

(मूळ लेखक: जेफ्री आर्चर)

Story of Corruption

ही आगळीवेगळी कथा आहे आफ्रिकेतल्या नायजेरिया देशातली. जेंव्हा श्रीयुत अगराबी तिथले अर्थमंत्री झाले तेंव्हाची. तसे ह्या नवीन अर्थमंत्री नियुक्तीचे फारसे कौतुक कुणाला नव्हते. राजकीय समीक्षकांच्या मते तर ही "रोज मरे त्याला कोण रडे" यातली गोष्ट होती. आणि तेही काही पूर्णपणे खोटे नव्हते -- वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे गेल्या १७ वर्षात नायजेरियाचे अर्थमंत्री तब्बल १७ वेळा बदलले गेले होते!

"जर तुम्ही भ्रष्टाचारापासून चार हात दूर असाल तरच माझ्या तावडीतून वाचाल" अशी गर्जना अगराबींनी शपथविधीच्या कार्यक्रमातच केली. भाषणाचा शेवट त्यांनी नायजेरियाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे गंभीर आश्वासन देऊन केला. पण ह्या आश्वासनांना कुणी फारसा भाव दिला नाही. वृत्तपत्र संपादकांच्यामते तर आधीच्या १७ अर्थमंत्रांनी अशीच आश्वासने दिली असल्याने त्यात छापण्यासारखेसुद्धा विशेष काही नव्हते.

अगराबींनी मात्र बोलल्याप्रमाणे करण्याचा सपाटाच लावला. काही दिवसातच खाद्यमंत्रालयातील एका अधिकाऱ्याला खोटी कागदपत्रे बनवल्याबद्दल त्यांनी तुरुंगात पाठवले. पुढचा फटका आयात-निर्यात खात्यातील एका उच्च अधिकाऱ्याला बसला आणि हद्दपार होण्याची कठोर शिक्षा त्याच्या वाट्याला आली. त्यानंतर महिनाभरातच अगराबींनी सर्वांनाच एक जबरदस्त धक्का देऊन त्यांची दखल घेण्यास भाग पाडले -- पोलीस खात्यातील सर्वोच्च अधिकाऱ्यालाच त्यांनी लाच घेताना रंगेहात पकडवून दिले! त्या अधिकाऱ्याला नंतर न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे १८ महिन्याच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

आता मात्र नायजेरियाचे नागरिक ह्या नव्या अर्थमंत्र्याकडे आशेने पाहू लागले. काहींनी तर त्यांना "भ्रष्टाचार संपवणारा अवतार" अशी उपाधी दिली. भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकारी आता अस्वस्थ होऊ लागले. अगराबीनी मात्र आपले काम अथक चालूच ठेवले. अटकेवर अटकेचे सत्र चालू राहिलं. पुढे पुढे तर अगराबींच्या करडया नजरेखाली नायजेरियाचे सर्वेसर्वा "जनरल ओतोबी" सुद्धा असल्याच्या अफवा पसरु लागल्या. श्रीयुत अगराबींनी आता सर्व परराष्ट्र कंपन्यांबरोबरचे आर्थिक करार जातीने पाहायला सुरुवात केली. करोडो रुपयांचे व्यवहार त्यांच्या स्वाक्षरीविना अडू लागले. अर्थातच त्यांच्या विरोधकांनी या सर्वच व्यवहारांची कसून तपासणी केली पण त्यात ते आक्षेपार्ह असे काहीच शोधू शकले नाहीत. जनमानसात अगराबींची प्रतिमा "एक स्वच्छ नेता" अशी रुजू लागली. या लोकमताच्या बळावर अगराबी सलग दुसऱ्यांदा अर्थमंत्री म्हणून निवडून आले आणि मग मात्र राजकीय समीक्षकसुद्धा त्यांच्याकडे कौतुकाने बघू लागले.

त्यानंतर काही दिवसातच प्रत्यक्ष "जनरल ओतोबी" यांनी अगराबींना अचानक भेटीसाठी आपल्या घरी बोलावले. श्रीयुत अगराबी बरोबर ठरलेल्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले. जनरल ओतोबींनी त्यांचे साजेसे स्वागत करून आपल्या फक्त खासगी चर्चेसाठी असणाऱ्या वैयक्तिक कक्षात नेले.

"श्रीयुत अगराबी, " जनरल ओतोबींनी आपल्या भारदस्त आवाजात बोलायला सुरुवात केली. "मी आत्ताच तुम्ही सादर केलेला आर्थिक अहवाल वाचून पूर्ण केला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे परराष्ट्रीय कंपनींच्या योजनांमध्ये अजूनही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. खरंतर हे वाचून मला धक्का वगैरे बसला नाही. पण मी हे जाणायला उत्सुक आहे की हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जात आहेत."

श्रीयुत अगराबी ताठ मानेने जनरल ओतोबींकडे पहात होते. त्यांच्यावरची आपली तीक्ष्ण नजर न काढता ते म्हणाले, "मला शंका आहे की हे पैसे स्विस बँकेमध्ये काही खात्यामध्ये गुप्तरित्या जमा होत आहेत. ती खाती नेमकी कोणाची आहेत याची मात्र मला अजून खात्रीलायक माहिती मिळवता आली नाहीये. कदाचित माझे मर्यादीत अधिकार माझा अडथळा बनत आहेत."

"तर मग मी तुम्हाला लागतील ते अधिकार द्यायला तयार आहे. पण ही माहिती मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही काम सुरु ठेवा, कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका अगदी माझ्या मंत्री मंडळातील मंत्री सुद्धा याला अपवाद नाहीत. कोणतीही दया-माया दाखवू नका. कोणाचाही हुद्दा, अधिकार, राजकीय नाते-संबंध याचे दडपण न ठेवता तुमचे तपासकार्य चालू राहूदे."

या जनरल ओतोबींच्या आश्वासनाने अगराबी प्रसन्नपणे हसले व म्हणाले, "अशा प्रकारचे काम पार पाडण्यासाठी मला तुमच्या स्वाक्षरीचे सर्वाधिकार पत्र लागेल. तसेच …"

अगराबींना त्यांचे वाक्य पूर्ण न करु देता जनरल ओतोबी म्हणाले, "ते अधिकारपत्र आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुमच्या टेबलावर असेल."

"हे सर्वाधिकार मला परदेश दौऱ्यात सुद्धा लागतील जेणेकरुन मला स्वीस बँकेतल्या खात्यांची माहिती मिळवणे सोपे जाईल.", अगराबींनी आपले अर्धे राहिलेले वाक्य पूर्ण केले.

"मंजुर आहे." जनरल  ओतोबी हसतमुखाने म्हणाले. आणि चर्चा संपली असे समजून दोघेही उठले.

"आभारी आहे" असे म्हणत अगराबी दरवाज्याच्या दिशेने निघाले तेवढयात जनरल ओतोबींनी खिशातून एक छोटे पिस्तुल बाहेर काढले.

अगराबींनी चमकून जनरल ओतोबींकडे आणि त्यांनी बाहेर काढलेल्या पिस्तुलाकडे पहिले.
क्रमशः कथेचा उर्वरित भाग २ इथे वाचा 


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment