Sunday, July 21, 2013

Marathi Story: भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा - भाग २)

(मूळ लेखक: जेफ्री आर्चर)
मागील भागावरुन पुढे चालू: भाग १ इथे वाचा
"हे जवळ ठेवा. मला खात्री आहे तुम्हाला बरेच शत्रू तयार झाले असतील. आणि नसतील तर आता होतील." पिस्तुल पुढे करत जनरल ओतोबी म्हणाले.

"धन्यवाद" असे पुटपुटत अगराबींनी ते पिस्तुल आपल्या खिशात ठेवले आणि ते बाहेर पडले.

त्यानंतर अगराबींनी आपले काम अजून वेगाने सुरु केले. रात्र-रात्र ते कागदपत्रे वाचत असायचे, संगणकावरचे रेकॉर्डस तपासायचे. पण दिवसा याबद्दल कोणाशीही एक चकार शब्द बोलायचे नाहीत. जवळपास तीन महिन्यानंतर अगराबी आपले कार्य तडीस न्यायला सिद्ध झाले. आपल्या गुप्त परदेश दौऱ्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिना निवडला. हा नायजेरियन नागरीकांसाठी सुट्टीचा महिना असल्याने बहुतांशी लोक प्रवासाला जायचे आणि त्यामुळे अगराबींची अनुपस्थिती फारशी कुणाला जाणवणार नाही हा त्यामागचा मूळ उद्देश. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आपल्यासाठी व आपल्या कुठुंबियांसाठी अमेरिकेचे विमान-तिकिट काढायला सांगितले. त्याचा खर्च आपल्या वैयक्तीक खात्यातून करायचे सांगायला मात्र ते विसरले नाहीत!

अमेरिकेतील ओर्लांडो या ठिकाणी पोचल्यादिवशीच अगराबींनी बायकोला आपण काही दिवस न्यूयॉर्कला कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बायका-मुलांना ओर्लान्डो डीजने-पार्क मध्ये सोडून अगराबी न्युयोर्कला विमानाने निघाले. न्युयोर्क विमानतळावरच त्यांनी स्वित्झर्लंडचे रिटर्न तिकीट रोख पैसे भरून खरेदी केले आणि काही तासातच अगराबींचा स्वित्झर्लंडकडे प्रवास सुरु झाला. स्वित्झर्लंडमध्ये पोचल्यावर त्यांनी एका छोट्याशा हॉटेलमध्ये रूम बुक केली व जेवण करून तब्बल आठ तासाची निवांत झोप घेतली. सकाळी उठल्यावर नाश्ता करता-करता त्यांनी नायजेरियात गेल्या तीन महिन्यात काळजीपूर्वक बनवलेली बँकेंची लिस्ट डोळ्याखालून घातली व त्यातल्या पहिल्या बँकेच्या चेअरमनला फोन लावला. दुपारी बारा वाजताची भेटीची वेळ दोघांना सोयीची असल्याने त्या वेळी भेटायचे ठरवून त्यांनी फोन बंद केला.

एक साधी सुटकेस सोबत घेऊन अगराबी वेळेच्या काही मिनिटे आधी बँकेत पोचले. एक अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच उभा होता. नायजेरियाच्या अर्थमंत्र्याच्या साध्या वेषाचे आश्चर्य चेहऱ्यावर न दाखवता तो अधिकारी त्यांना तडक चेअरमनच्या ऑफिसकडे घेऊन गेला.

दारावर टकटक करताच आतून "आत या" असा आवाज आला आणि दोघेही ऑफिसमध्ये गेले. अगराबींना पाहताच चेअरमन खुर्चीवरुन उठले आणि हस्तांदोलनासाठी पुढे आले. प्राथमिक ओळखीनंतर तिघे ऑफिसमध्ये चर्चेसाठी असणाऱ्या कक्षात गेले.

चहापानाचा सोपस्कार उरकल्यानंतर अगराबींनी वेळ न दवडता थेट मुद्याला हात घातला, "माझ्या राष्ट्राध्यक्षांच्या खास आज्ञेवरून मी इथे आलो आहे. आपल्या बँकेत ज्या नायजेरियन नागरिकांची खाती आहेत त्यांची माहिती मला हवी आहे."

बँक चेअरमन हे ऐकल्यावर गडबडीने म्हणाले, "मला तशी माहिती देण्याचे अधिकार नसून …"

त्यांचे बोलणे अर्ध्यावर तोडून एका हाताने त्यांना थांबवत अगराबी म्हणाले, "मला एकदा माझे म्हणणे पूर्णपणे मांडू द्यावे अशी माझी विनंती आहे. मला राष्ट्राध्यक्षांनी या बाबतचे सर्वाधिकार दिले आहेत." आणि त्यांनी आपल्याजवळचे अधिकारपत्र सादर केले.

चेअरमननी ते अधिकारपत्र पूर्णपणे वाचले आणि मग घसा साफ करत ते बोलले, "मला मान्य आहे की आपण इथे आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरुन पूर्ण अधिकारासहित आला आहात पण मला कृपया क्षमा करावे. आमच्या बँकेच्या नियमानुसार मी कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकत नाही. आणि या नियमाला कोणताच अपवाद नाही. आपण आमच्या बँकेला भेट दिल्याबद्दल मी आभारी आहे पण मी आपली या कामामध्ये काहीच मदत करू शकत नसल्याने दिलगीर आहे." एवढे बोलून चर्चा संपली या उद्देशाने चेअरमन आणि त्यांच्याबरोबरचा अधिकारी दोघेही उठले.

पण अगराबी आपल्या खुर्चीवरुन न उठता म्हणाले, "मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सहकार्य केलेत तर माझ्या देशाच्या संपूर्ण परराष्ट्र व्यवहारांसाठी आम्ही आपल्या बँकेची मध्यस्त म्हणून निवड करू इच्छितो."

"आम्ही अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी नेहमीच आपले ऋणी राहू. पण तरीही यामुळे आमच्या नियमामध्ये फरक पडू शकणार नाही व आम्ही कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकणार नाही हे आपण कृपया लक्षात घ्यावे." या चेअरमनच्या वाक्याने विचलित न होता अगराबी ठामपणे म्हणाले, "तर मग मला आमच्या परराष्ट्र खात्याला आपल्या असहकार्याबद्दलची तक्रार करावी लागेल. तसेच ह्या बद्दल तुमच्या देशाच्या अर्थखात्याकडे आणि प्रसारमाध्यमांकडे तशी तक्रार दाखल करावी लागेल. ह्या सर्व संभाव्य अडचणी टाळायच्या असतील तर आपण कृपया माझी विनंती मान्य करून खातेदारांची माहिती द्यावी. मी आपल्याला खात्री देतो की आपण अशी माहिती दिल्याची कुठेही वाच्यता होणार नाही."

"आपण खुशाल अशी तक्रार दाखल करू शकता. पण मी बँकेच्या नियमांनी बांधील आहे. तसेच स्वित्झर्लंडच्या कायद्यानुसार आमच्या अर्थखात्यालासुद्धा बँकेच्या नियमामध्ये फेरफार करता येऊ शकत नाही." चेअरमन तेवढयाच ठामपणे उतरले.

"जर असे असेल तर आजपासून नायजेरियाचे आपल्या देशाशी होणारे सर्व व्यवहार मला थांबवावे लागतील. तसेच स्वीस नागरिकांना आणि कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या नायजेरियातील सर्व सुविधा काढून घ्याव्या लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की यातले काहीही करताना मी जरासुद्धा कचरणार नाही."

"आपण आपल्या अधिकारातील कोणतीही गोष्ट करू शकता. पण मी आपली याबाबत कोणतीच मदत करू शकणार नाही. तेंव्हा आपण ही चर्चा इथेच थांबवलेली योग्य. पुन्हा एकदा आपण आमच्या बँकेमध्ये … " चेअरमनना त्यांचे वाक्य पूर्ण करू न देता अगराबींनी खिशातून पिस्तुल बाहेर काढले व त्यांच्यावर रोखून ते बोलले, "आपण मला  दुसरा कोणताच मार्ग शिल्लक ठेवला नाहीये त्यामुळे नाईलाजाने मला याचा उपयोग आपल्यावर करावा लागेल. मी आपल्याला शेवटचे विचारतो आहे -- आपण मला माझ्या देशातल्या खातेदारांची माहिती देणार आहात  की नाही?"

आता मात्र चेअरमनच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. सोबतच्या अधिकाऱ्याच्यासुद्धा कपाळावर हे पाहून घामाचे थेंब जमा झाले. पण त्यातूनही चेअरमननी मानेने नकार दिला. अगराबींनी पिस्तुलाच्या मागचा खटका सरकवला जेणेकरून आता कोणत्याही क्षणी ते पिस्तुलातून गोळी झाडू शकतील. "मी आता अगदी शेवटचे विचारतो आहे. होणाऱ्या परिणामाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात हे ध्यानात ठेवा. आपण माहिती देणार आहात की नाही?"

चेअरमन आणि सोबतचा अधिकारी -- दोघांनीही आता कोणत्याही क्षणी पिस्तुलातून गोळी निघेल आणि आपला बळी जाईल या भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. काही क्षण गेल्यानंतर अजून कसा आवाज आला नाही म्हणून दोघांनी डोळे उघडून पहिले तर अगराबींच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि ते तसेच कायम ठेवत ते म्हणाले, "कमाल! मी खरंच आपल्या आणि आपल्या बँकेच्या गुप्ततेवर खुश आहे. कृपया मला आपण आपल्या बँकेत खाते कसे उघडायचे याची माहिती द्याल का?" एवढे बोलून त्यांनी आपल्या बरोबर आणलेली साधी दिसणारी सुटकेस उघडली आणि त्यात काठोकाठ भरलेल्या नोटा पाहून बँकेचे चेअरमन आणि सोबतचा अधिकारी दोघेही क्षणापुर्वीची भीती विसरुन अगराबींच्या हास्यात सामील झाले!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment