Sunday, July 7, 2013

Marathi Article: श्रद्धा विज्ञानविरोधी आहे का?

(लेखक: सुमित घाटगे)

समजा … तुम्हाला रस्त्यात एक चकचकीत पिवळा धमक धातूचा तुकडा मिळाला तर तुम्ही डोळे झाकून असं  म्हणता का की हा सोन्याचा आहे? नाही. तुम्ही तो घेऊन सोनाराकडे जाता, तो सोन्याचाच आहे याची खात्री करून घेता, आगीत टाकून त्याची सत्वपरीक्षा करता आणि मग शेवटी कबूल करता की ते खरोखरच सोने आहे. श्रद्धेचेही तसेच आहे किंबहुना तसेच असले पाहिजे.

Spirituality and Science

देव आहे की नाही असा एक वाद नेहमी रंगवला जातो. या प्रश्नाचे नेमके उत्तर कुणीच सांगू शकत नाही याची जाणीव असल्यानेच हा वाद चिरंतन ठरला आहे. वस्तुतः या मतभिन्नतेला "वाद" म्हणायचेही कारण नाही. कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. तो द्रुष्ट स्वरुपात दाखवता येणार नाही. पण त्याचबरोबर तो नाकारला तर निसर्गाच्या किंवा मनुष्याच्या अस्तित्वाचा अर्थही लावता येणार नाही यामुळे देव जेंव्हा श्रद्धेचा, भक्तीचा, मूल्यांचा विषय न राहता व्यापाराचा विषय होतो तेंव्हा वाद निर्माण होतो. राम हा मुल्यांचा विषय न होता मतांचा विषय होतो तेंव्हा वाद उदभवतो. काही रामभक्तांना सत्यवचनी रामाची आठवण होते व त्याचे मंदिर "तिथेच"  बांधण्याचा निग्रह तयार होतो. त्याचवेळी काहीजणांना असे वाटते की रोजच्या व्यवहारात सतत खोटे बोलणारे, रामाचे पावित्र्य भंग करणारे लोक हे मंदिर बांधून कोणता सदाचार निर्माण करणार आहेत?

उदात्त तत्वांचा विचार करायचा आणि प्रत्यक्षात रोजच्या व्यवहारात फसवणूक करायची हा दांभिकपणा समाजात मुरतो तेंव्हा मूल्यव्यवस्था बिघडते. धर्म, नीती आणि विचार भ्रष्ट होतात. त्यामुळेच श्रद्धेचा व्यापार सहन न होणारे काही सुधारक त्याविरुद्ध उभे राहतात. कडक नियम करून समाजाचे वाहते-खळाळते जीवन अवरुद्ध करणारे पुराणमतवादी व वेळोवेळी हे बांध फोडून प्रवाहाला गतिमान करणारे पुरोगामी हाही एक सतत चालणारा संघर्ष आहे. त्यामुळे कधी कर्मकांडाविरुद्ध, कधी धर्मसत्तेविरुद्ध, कधी राजसत्तेविरुद्ध उठाव होतात आणि नवी नीतिमूल्ये प्रस्थापित होतात.

प्रत्येक वेळी अशा नव्या नीतिमूल्यांचा स्वीकार होत असताना संघर्ष उद्भवतो. जे काळानुसार बदलत नाही ते नष्ट होते हा इतिहास आहे. जीवापाड जपलेल्या श्रद्धा व मुल्यांचा ऱ्हास होत असलेला पाहून काहीजण दुःखी होतात. त्यामुळेच आपल्या श्रद्धांची काळाच्या कसोटीवर तपासणी होणार म्हटले की परंपरावाद्यांना व संस्कृतिरक्षकांना असुरक्षित वाटते. तो धर्माचा अपमान वाटतो. पण ज्यांना काळाची आव्हाने समजतात ते दूरदृष्टीचे महामानव समाजाला भवितव्याची दृष्टी देतात. त्यांना संस्कृतीच्या विनाशाचे नव्हे तर उत्क्रांतीचे महत्व समजलेले असते.

व्यवहारातले याचे सोपे उदाहरण द्यायचे झाले तर सुमारे शंभरएक वर्षापुर्वी महाराष्ट्रातले ज्वलंत सामाजिक प्रश्न कोणते होते? एक प्रश्न होता "संमती" वयाचा. म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर तिचा विवाह कोणत्या वर्षी करावा आणि तिचा शरीरसंबंध केंव्हा सुरु व्हावा, या संबंधाला संमती देण्याचा अधिकार तिला केंव्हा मिळावा हा. आणि दुसरा प्रश्न होता स्त्रियांनी साडी नेसावी ती सकच्छ की विकच्छ - म्हणजे कासोटा घालावा की घालू नये? आज हे दोन्ही प्रश्न काळानेच संदर्भहीन ठरवले आहेत. त्यामुळे आज जर कोणी पुन्हा एकदा हेच प्रश्न उकरून काढू पहिले तर समाज त्याची दाखलही घेणार नाही. कारण ती चर्चा करू पाहणाऱ्यांना आपल्या संस्कृतीचे प्रेम नसून केवळ परंपरेचे वेड त्यामागे आहे हे सहज लक्षात येईल. शंभर वर्षापूर्वी मात्र हे विचार समाजाने सहजासहजी मान्य केले असते का?

स्त्रिया त्यांचा मासिक धर्म पाळताना "अस्पृश्य" असतात काय आणि धार्मिक कार्यासाठी अपवित्र ठरतात काय असा एक वाद रंगवला गेला. याच कारणास्तव कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी प्रसादाचे लाडू करण्याचे कंत्राट स्त्रियांना देऊ नये असे या परंपरावाद्यांना वाटले. त्यासाठी त्यांनी शोधलेली करणे विचित्र होती. या काळात स्त्रियांच्या अंगी "हार्मोनल" बदलामुळे रजोगुण वाढतात व धर्माला हे मान्य नाही अशा काहीतरी वैचारिक कोलांटीउड्या त्यांनी मारल्या. अर्थात यामागे धार्मिकतेपेक्षा "आर्थिक" हितसंबंध जास्त महत्वाचे आहेत ही गोष्ट वेगळी. पण पुरुष कंत्राटदाराला हे लाडू कंत्राट मिळाले तर तोही स्त्रियांकडूनच हे लाडू तयार करून घेईल व ते मात्र ह्या संस्कृतीरक्षकांना चालेल ही यातली गोम आहे. शिवाय स्त्री-पुरुष शरीरात निसर्गानेच भेद ठेवला आहे व प्रजोत्पादनाचे व मानवजातीला सावरण्याचे, पुननिर्माणाचे, नवजीवनाचे महान कार्य करणारे जे देहव्यापार स्त्रीला सोसावे लागतात ते तिला अपवित्र कसे करू शकतात हा समंजस मनाला सतावणारा प्रश्न आहे.

याच चिकित्सक दृष्टीमुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानवही श्रद्धेची चिकित्सा करतो. ते म्हणतात "समजा … तुम्हाला रस्त्यात एक चकचकीत पिवळा धमक धातूचा तुकडा मिळाला तर तुम्ही डोळे झाकून असं  म्हणता का की हा सोन्याचा आहे? नाही. तुम्ही तो घेऊन सोनाराकडे जाता, तो सोन्याचाच आहे याची खात्री करून घेता, आगीत टाकून त्याची सत्वपरीक्षा करता आणि मग शेवटी कबूल करता की ते खरोखरच सोने आहे. श्रद्धेचेही तसेच आहे किंबहुना तसेच असले पाहिजे."

परंतु वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? भौतिकशास्त्राचे नियम किंवा प्रयोगशाळेतील पडताळा म्हणजेच विज्ञान आहे काय? की सृष्टीच्या विज्ञानाची मर्मे हे खरे विज्ञान आहे? मनुष्याने रचलेल्या ज्ञानशाखा व त्यातून सिद्ध झालेली तत्वे ही अंतिम मानावीत की नाही? असे प्रश्न जेंव्हा उत्तरे मागतात तेंव्हा लक्षात येते की प्राप्त विज्ञानाच्या अभ्यासातून सर्व अज्ञानाची उत्तरे शोधता येतील हाही एक भ्रमच आहे. विज्ञान ही मनुष्याच्या हातातील एक मोजपट्टी आहे. तिच्या सहाय्याने विश्वाचे माप मोजायचे असेल तर कधी न कधी संपूर्ण विश्वाचे मोजमाप आपल्याला करता येईल असे म्हणायला हरकत नाही. पण याचा अर्थ ती मोजण्याचे "धोरण" पक्के झाले. मोजणी पूर्ण झाली असा त्याचा अर्थ नव्हे. मग हे "धोरण" तरी चिरकाल अबाधित असू शकते का, हा प्रश्न विज्ञानवाद्यांनी सोडवायला हवा.

विज्ञानवाद्यांनी हा प्रश्न सोडवताना केवळ भौतिकशास्त्राचा आधार घेऊन चालत नाही. मॅक्सम्युलर या जर्मन पंडिताने संस्कृत भाषेतील महान ग्रंथाचा अभ्यास केला. अभ्यासानंतर त्याचे असे मत बनले की भारत हा एकेकाळी तत्वव्येत्यांचे राष्ट्र होते. सर्व लोक अध्यात्मिक जीवनात दंग होते. अध्यात्मिक निष्ठेमुळे त्यांच्या राष्ट्रभावनेच्या शक्ती क्षीण झाल्या. त्यांची संहारक शक्ती नष्ट झाली व जगाच्या इतिहासात भारताला स्थान उरले नाही. हा विज्ञानवाद म्हणायचा की शास्त्रवाद?

विज्ञानवादी व विशेषतः प्रयोगवादी शास्त्रज्ञांनी आजवर अनेक शोध लावले. ही परंपरा खरी सुरु झाली ती चाकाच्या शोधापासून. अग्नीच्या शोधानंतर. नंतर गणितातला शून्याचा शोध आणि हजार वर्षापूर्वीचा वराहमिहीराचा "पृथ्वी आकाशात तरंगते" हा सिद्धांतही जुनाच. हे शोध धर्माने पचवले. कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिद्धांत किंवा डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत धर्माने मान्य केला. विज्ञान व तत्वज्ञान हे दोघे मात्र असे लवचिक नाहीत. त्यामुळे धर्माला हटवणे विज्ञानाला शक्य होत नाही. मनुष्यात "अतिमानवी" शक्तीवर विश्वास ठेवण्याची एक (urge) प्रेरणा असते. त्याला मानवी मेंदूतील रचना व जेनेटिक यंत्रणेचा पाया आहे. लहान वयातच धर्म आणि अध्यात्माशी तो निगडीत होतो. विज्ञान मात्र त्याला अभ्यासातून शिकावे लागते. म्हणूनच अध्यात्म आयुष्यभर टिकते व विज्ञानाचा पगडा आयुष्याच्या अखेरीस धुसर व्हायला लागतो. त्यामुळेच अनेक महान शास्त्रज्ञांना आयुष्यभर विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर शेवटी अध्यात्माच्या गूढ प्रवासाची अधिक गोडी वाटू लागते.

आर्किमिडीज, न्यूटन, एडिसन, आईनस्टाईन हे सर्व महान शास्त्रज्ञ होते. त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेबद्दल मानवजातीला अपरंपार आदर आहे. तरीही या शास्त्रज्ञांनी जगाच्या इतिहासातील जे क्रांतीकारी शोध लावले ते सृष्टीच्या रहस्याचा पूर्ण भेद करणारे होते काय? निसर्गाने जी अगणित रहस्ये चराचरात साठवून ठेवली आहेत त्यातली दोन-चार रहस्ये मनुष्याला समजली असे म्हणावे इतकेच या शोधांचे स्थान आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा कोपर्निकसने लावलेला शोध शास्त्रीय जगात महान क्रांतीकारी मानला गेला. त्यांनी लावलेले शोध मनुष्यजातीला क्रांतीकारी वाटले तरी माणसाने ह्या शोधांचा किती अहंकार बाळगावा?

एका आकाशगंगेत दोनशे अब्ज सूर्य आहेत आणि त्यातल्या एका सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरते. त्या सूर्यावर रोज अणुबॉम्ब-हायड्रोजन बॉम्बचे स्फोट हजारांनी होतात. अशावेळी अणुबॉम्बचे रहस्य शोधले याचा मानवाने किती गर्व करावा?

शिवाय निसर्गाची ही रहस्ये शोधून मानवाने आजवर जी वाटचाल केली तिला तरी प्रगती म्हणायचे का हाही प्रश्नच आहे. पिएरे क्यूरी या नोबेल पारितोषिक विजेत्याने (त्याची शास्त्रज्ञ पत्नी मेरी क्यूरी हिलासुद्धा पारितोषिक विभागून मिळाले होते) नोबेल पदक स्वीकारताना जे भाषण केले त्यात तो म्हणाला की निसर्गाची रहस्ये समजून घेऊन माणसाचं नक्की भलं होणार आहे काय? मला तरी या शोधामुळे विकास नव्हे तर विनाशाकडेच जात असल्यासारखे वाटते.

क्यूरी दांपत्याने रेडियम या धातूचा व किरणोत्सर्गाचा शोध लावला. अणूचे रहस्य उलगडण्याची ती पहिली पायरी होती. त्यानंतर ४० वर्षांनी जेंव्हा अणुरचना व त्यातून अणुस्फोटाचा विध्वंसकारी शोध लागला तेंव्हा क्यूरीची भविष्यवाणीच जणू खरी ठरली. कारण या महास्फोटाची विनाशकारी शक्ती लक्षात घेऊन व तिचा उपयोग मानवी संहारासाठी होणार आहे याची स्पष्ट कल्पना शास्त्रज्ञांना आली तेंव्हाही त्यांनी हा प्रयोग थांबवला नाही. जर्मन व इटली हे प्रबळ शत्रू पराभूत झालेले असताना व दुबळा जपान शरणागतीसाठी गुडघे टेकत असताना त्यांच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून ७० हजार माणसे क्षणात जाळून टाकली ते क्रूरकर्म अपुरे वाटले म्हणून पुढचा बॉम्ब चार दिवसांनी टाकण्याचे नियोजन रद्द करून तीनच दिवसांनी पुन्हा नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकून त्याही शहराची राखरांगोळी केली.

शास्त्रज्ञांनी लावलेले शोध किंवा निसर्गाची उकललेली रहस्ये आजवर माणसाच्या सुखसमाधानापेक्षा त्याच्यातील हिंसक वृत्ती, लढाया, रक्तपात यासाठीच वापरली गेली असे इतिहास सांगतो. त्यामुळे श्रद्धेने विज्ञानाच्या विरोधात उभे राहू नये आणि त्याचबरोबर विज्ञानानेही श्रद्धेची मुळे तोडू नयेत!



ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment