Saturday, August 17, 2013

Marathi Article: तारे जमींपर

हार्मोनिअम वाजविण्याचे माझे एक स्वप्न आहे. आजही ते स्वप्नच राहिले कारण नोकरी-व्यवसायाच्या धकाधकीत  आयुष्य अस्ताला लागले तरी या छंदाला मला न्याय देत आला नाही. अर्थात हर्मोनिअम वाजवून पोट भरता येणार नाही याची जाणीवही मला निश्चित आहे. पण तीन साप्तकातून सात स्वरांची उलगडणारी सुरावट आजही मनाला मोहविते. लहानपणी त्या काळ्या पांढऱ्या  पट्ट्यांवर सफाईदारपणे  फिरणारी पेटीवाल्याची बोटे पाहताना आणि भात्याच्या भोकातून उघडझाप करणारी पुठ्ठ्याची वर्तुळे निरखताना कानाला मधूर  वाटणारे स्वर मनाच्या गाभार्यापर्यंत पोहोचत होते हे निश्चित. म्हणूनच कधी आपल्यालाही अशी बोटे चालविता यावीत असे वाटायचे.

लहानपण तसे अनेक स्वप्नांना जन्म देते. आगगाडीच्या इंजिनाची शिटी वाजवणे असेल किंवा बँडवाल्याच्या क्लिरोनेटवर हात फिरवावासा वाटणे असो. या बालसुलभ स्वप्नांना वगळले तर शालेय जीवनात करियरची स्वप्नं पडू लागतात आणि या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पूर्वसुरींच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी नेहमीच्या मळलेल्या वाटाच निवडल्या जातात आणि छंद नावाच्या स्वप्नाला तडा जातो तो कायमचाच.

follow your dreams

नव्या युगाचा वेध घेताना नव्या उद्योग व्यवसायाची माहिती आणि व्यवहारी ज्ञान घेतले तर कदाचित आपल्याला नव्या वाटा चोखाळायला मिळू शकतत. इव्हेंट  मॅनेजमेंट, एन्व्हायर्नमेंट, डान्स, संगीत, रेकॉर्डिंग, कोरियोग्राफी, ऑर्केस्ट्रा, सूत्र संचालन, मुलाखतकार, पत्रकारिता, अनेक कामात सल्लागार, करियर  गायडन्स, समुपदेशन अशा इतक्या शाखांचे जाळे  उपलब्ध झाले आहे कि या क्षेत्रातले यश आपल्याला प्रसिद्धी आणि पैसा देऊ शकते. नव्या पिढीला "ग्लॅमरस" व्यक्तिमत्वाची ओढ असते. पडद्यावरील, मैदानावरील चेहरे त्यांचे "आयडॉल " बनत आहेत. शौर्य, प्रशासन आणि उच्च पदस्थाइतकाच या दिशेनेही तरुणवर्ग आकर्षित होत आहे. साध्या लग्नाची गोष्ट घेतली तरी किती व्यवसाय यात दडले आहेत हे समजते. कदाचित अशा व्यवसायाशी आपले नाते जमू शकले. आपला हरहुन्नरीपणा पणाला लावून यातील एखादे क्षेत्र निवडून उत्कृष्ठ टीमवर्क  करू शकतो.

छंदोपजिविका घडून आली तर जीवनात आनंदाला पारावर रहात नाही. गाणारे अनेक, वाजवणारे अनेक, रेकॉर्डीस्ट अनेक, केटरर्स अनेक म्हणून आपण कोणताच व्यवसाय निवडला नाही तर मात्र आपण निष्कारण आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर होता आले नाही याची खंत करत बसतो. दुसऱ्याच्या यशाने जळण्यापेक्षा आपल्या छोट्याशा आवडीच्या विषयात उजळत राहिलो तर आपणही एखाद्या दिवशी टोकावर पोहचू. "A bird in hand is worth two in the bush" ही  म्हण दुसऱ्याच्या यशाने त्रास न करता हातातील संधीचा ध्यास घ्यावा हेच सांगते. उलट कित्येक "ग्लॅमरस" लोक इतर व्यवसायातून वाट काढून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत. एखाद्या बिल्डरला, उद्योजकाला, उच्च पदावरील नोकराला पैशाची रास  मिळत असेल. बंगला, गाड्या, उच्चभ्रू राहणीमान, परदेशी प्रवास याही गोष्टी हाताशी असतील. परदेश प्रवास त्यांच्यासाठी "कीस झाड की पत्ती" असेल. पण छोट्याशा लहान मुलीला टीव्हीवर गाऊन देशाच्या कानाकोपऱ्यात  पोहोचता  येते. यावेळी लौकिक धंद्यातील निरर्थकता आणि आवडीच्या छंदाची सार्थकता लक्षात येते.

आपल्या गुहेचे दार  केंव्हा उघडेल हे कोणालाच माहित नसते. मात्र सतत ठोठावत राहणे, प्रतीक्षा करणे आणि उघडताच प्रवेश करणे हे जमायला हवे. यासाठी साधनांची नव्हे तर केवळ साधनेची गरज आहे. यासाठी संपत्ती नव्हे तर सातत्त्याची  गरज आहे. यासाठी पार्श्वभूमी नव्हे तर तपच्छर्या हवी. यासाठी कोणाचा वशिला नव्हे तर ती व्यक्ती स्वत: "जोशीला" असावी लागते. मग जीवनाच्या आकाशात यशाचा तारकासमूह तुमच्याच मालकीचा होतो आणि तथाकथित यशस्वी मोहऱ्यांचे तारे जमींपर येतात!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment