
अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या खूपच प्रसिद्ध आहे. त्यांची व्याख्या अशी "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य". मूळ इंग्रजीतील ती व्याख्या अशी -
By the people, Of the people, For the people.पण नंतर या व्याख्येतील फोलपणा जगभरातील राज्यकर्त्यांनी उघड करायला सुरवात केली. जुन्या व्याख्येशी फारकत घेऊन चलाख, बनेल राजकारण्यांनी केलेली दुसरी एक व्याख्या अशी -
Buy the people (लोकांना विकत घेणारी), Off the people (लोकांचा विचार न करणारी), Far from the people (लोकांपासून बाजूला गेलेली).ही व्याख्या सध्या तरी भारतीय लोकशाहीला बऱ्यापैकी लागू पडते. कारण इथे लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे.
ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र पैसा पेरून निवडून येण्याचे शास्त्र उत्तमपणे विकसित झाले आहे. विधानपरिषद व राज्यसभेच्या निवडणूका म्हणजे तर धनदांडग्यांनी चालवलेले लोकशाहीचे बीभत्स वस्त्रहरणच म्हणावे लागेल. निवडणूक, मतदान, जनाधार, संसदीय प्रणाली ही सर्व एक प्रचंड फसवणूक ठरली असून आपण सर्वांनी ती मान्यही करून टाकली आहे. "मला" स्वत:ला यात काहीच करावयाचे नसल्याने सगळा दोष "लोकां"वर टाकून निवांत बसण्याची छान सोय या "शाही"त आहे. गुंडांना निवडून येण्याची जास्त संधी असते म्हणून नेते त्यांना "तिकीट" देतात. हि "संधी" लोकच देतात ना? मग दोष कुणाचा?
अर्थात लोकांचे हे अज्ञान दूर होऊ नये म्हणून सदैव देव पाण्यात बुडवून बसणाऱ्या राजकारण्यांनाही त्यातला काही दोष पत्करावा लागेलच. त्याशिवाय लोकशाहीची आणखी एक तिसरी व्याख्या आता नव्याने आकार घेत आहे. लोकशाही म्हणजे आंधळ्यांच्या पाठीवर बसलेला पांगळा. यातला आंधळा म्हणजे नोकरशहा. त्याला फक्त चालता येते - दिसत नाही. आणि पांगळा म्हणजे राज्यकर्ता. याला पाय नाहीत, पण हवं ते नेमकं "दिसतं"! एकमेकांच्या आधाराशिवाय काहीच करू न शकणारी पण एकत्र आली की कुणालाही सहज चीतपट करू शकणारी ही जोडगोळी. "पळ" म्हटलं की पळणारे आंधळे अधिकारी आणि या आंधळ्यांच्या पाठीवर बसून अलगदपणे अलीबाबाच्या गुहेपर्यंत पोहोचणारे राजकारणी. या दोन "शाही" लोकांची जोडी एकदा जमली की मग या लोकशाहीत लोकांची गरजच उरत नाही!
No comments:
Post a Comment