(मूळ लेखक: अज्ञात)

माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं! इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत अजूनही मनाला बोचते आहे. जरा सविस्तर सांगतो. यंदा लग्नकर्तव्य असल्याने एका मुलीसोबत परिचयभेटीचा कार्यक्रम ठरला. रविवारची दुपार तशी निवांत पहुडण्यासाठी असते ही म्या पामराची भ्रामक कल्पना त्यादिवशी मोडीत निघाली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास माझा भ्रमणध्वनीसंच केकाटला. हो, केकाटलाच म्हणेन मी. सकाळची रम्य किंवा सायंकाळची रोमॅटिक वेळ असती तर "किणकिणला" असा मंजुळ शब्द मी वापरला असता. पण भर दुपारी भरपेट जेवण झाल्यावर तेही रविवारी भ्रमणध्वनीसंच (सध्या इंग्लिश शब्द सोडून अतिअवघड मराठी शब्द वापरण्याची प्रथा आहे म्हणून…) बोंबलत असेल तर "केकाटणं" हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते. असो.
मी फोन घेतला आणि पलीकडून अतिमंजूळ स्वर कानी पडला. आमचा राग क्षणार्धात विरघळला. कुठल्यातरी हॉटेलमध्ये भेटायचं का अशी विचारणा करणारा एका मुलीचा फोन होता. मला काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात नळस्टौप वरचं "समुद्र" किंवा तिथेच सिग्नलजवळचे "पाताळेश्वर" हे पर्याय घोळत होते. पण ती म्हणाली की लॉ कॉलेज रोडवर "बरिश्ता" कॅफे मध्ये जाऊयात. मी जरा गडबडलो. मी स्वतः असल्या हाय-फाय हॉटेलमध्ये कधी गेलो नव्हतो. पण हो म्हणालो. संध्याकाळी सहा वाजताची वेळ ठरली. मी तिला आधी नीट पत्ता विचारून घेतला. आपण असल्या भानगडीकडे बघतच नाही म्हटल्यावर माहित असण्याचा संबंधच नव्हता. आपण सिंगल स्क्रिनवाली मानसं, मल्टीप्लेक्स कल्चर अजून अंगवळणी पडले नाही. राहुल किंवा नीलायमला टाळ्या आणि शिट्ट्या मध्ये पिक्चर बघण्याची मजा सोडून मख्ख चर्येने पिक्चर बघणे आणि निमुटपणे घरी जाऊन झोपणे आपल्याला बुवा जमत नाही.
तर मी ठरल्याप्रमाणे ६ वाजता तिथे जाऊन पोहोचलो. गेटवर उभा राहिलो. आत जाऊन बसण्याची हिम्मत नव्हती. आणि इच्छाही. थोडया वेळाने ती आली. स्कुटी स्टॅडवर लावत ती माझ्याकडे बघत मंद हसली. मी पण स्मित केले आणि आम्ही आत गेलो. आतला सीन बघून मी हबकलोच. बऱ्याच मुली बाहेर प्रचंड उकाडा असल्यागत अतितोकडे कपडे घालून बसल्या होत्या. कपडे इतके तोकडे होते की जाऊ दया… आठवलं की क्लेश होतात मनाला. बिनधास्त सिगारेट पिणाऱ्या मुली आणि त्यांच्याजवळ मांजरासारखे बसलेले त्यांचे बॉयफ्रेंडस असं चित्र होतं तिथं.
मी जरा अवघडलो आणि तिला एका त्यातल्या त्यात सभ्य दिसणाऱ्या जोडप्याजवळच्या टेबलवर बसण्याची खुण (की विनंती?) केली. आता प्रश्न असा होता की हिला काय घे असे म्हणावे किंवा काय घेतेस असे विचारावे कारण तिथला मला एकही पदार्थ किंवा पेय माहीत नव्हते. हळूच तिला मी इथे ऑर्डर कशी देतात वगैरे प्राथमिक प्रश्न विचारून घेतले. तिने माझे थोडे शिक्षण केले. आमचा संवाद असा झाला -
"काय घेणार आहेस तू?" मी विचारले.
"आईस्ड टी" ती म्हणाली.
पहिल्यांदाच ऐकत होतो या पेयाचे नाव त्यामुळे नीट ऐकू आले नाही.
"आईस्क्रीम?" मी.
ती हसत आणि थोडं मोठ्याने म्हणाली, "आईस्ड टीईईई".
"इथे कशी सर्व्हिस असते?"
"सेल्फ सर्व्हिस असते इथे. आपण ऑर्डर दयायची आणि घेऊन यायची."
"आपण दोघांनी जायचं का ऑर्डर दयायला? मला एकट्याला जमेल असं वाटत नाही."
तिला माझी बहुधा दया आली असावी. आम्ही दोघेही काउण्टरवर गेलो.
क्रमशः कथेचा उर्वरित भाग २ इथे वाचा
No comments:
Post a Comment