Sunday, August 4, 2013

Marathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग २)

(मूळ लेखक: अज्ञात)
मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा
"कसा असतो आईस्ड टी? म्हणजे मी पण तोच घेतो. तसही मला इथला दुसरा पदार्थ किंवा पेय माहित नाही. काहीतरी भलतच घ्यायचो आणि माझी पंचाईत व्हायची!"

"पंचाईत" ह्या शब्दाला ती ठेचकाळली आणि मंद हसली. मला वाटलं की माझ्या बावळटपणाला हसली असेल.

"चांगला असतो", ती म्हणाली आणि आम्ही रांगेतून पुढे सरकलो.

काउण्टरवरच्या माणसाला म्हणालो, "टू आईस्ड टीज प्लीज."

तो अमेरिकेतून डायरेक्ट इम्पोर्ट झालेला असावा. म्हणाला, "व्हिच फ्लेवर सर?"

पुन्हा आली का पंचाईत? मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पहिले. ती तत्काळ उतरली, "पीच फ्लेवर". ती सराईत होती बहुतेक.

"वूड यु लाईक टू ट्राय आवर क्रीम फ्लेवर, सर?"

मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. कसा दिसतं असेन मी तेंव्हा? ती ठामपणे म्हणाली, "नो, पीच फ्लेवर फॉर मी."

मी जास्त चिकिस्ता न करता आणि वेळ न दवडता उत्तरलो, "पीच फ्लेवर फॉर मी टू."

मला वाटलं ३०-४० रुपये बिल होईल. दोन कप चहासाठी ३०-४० रुपयेदेखील "लई जास्त होत्यात. पन म्हनल ठीक हाय. बरिश्तामंधी आलो आपुन तर तेवढं द्यायाचं पायजे." पण त्याने निर्विकारपणे ९० रुपयांचा आकडा सांगितला. मी काढलेली ५० रुपयांची नोट ठेवून १०० ची काढली. मी पुढचा हिशोब करू लागलो.

हिच्याशी जर लग्न केलं आपण तर आपला मासिक पगार डायरेक्ट बरिश्तामध्येच जमा करावा लागेल. या विचारांनी मला वातानुकुलीत घाम फुटला. मी ट्रे घेऊन आलो आणि टेबलावर स्थानापन्न झालो. लालसर पाण्यात बर्फाचे ५-६ तुकडे टाकून तो जगावेगळा टी बनवला होता. जास्तीत जास्त २ रुपये किंमत असेल त्याची. पण त्याचे ४५ रुपये प्रत्येकी उकळले होते आमच्याकडून त्याने! अशा फसवणुकीत आम्ही आनंद मानायला लागलो आहोत हल्ली. सहज जिज्ञासा म्हणून तिला मी विचारले, "तू नेहमी येतेस का इथे?"

"विकएन्ड्सचा ब्रेकफास्ट इथेच करतो आम्ही."

मी आवंढा गिळला. मला वाटत होतं की आता ही पटकन मार्लबोरोचं पाकीट काढून सिगारेट शिलगावते की काय. पण तसं काही झालं नाही. माझं मन खट्टू (कुणी वापरत नाही हा शब्द फारसा हल्ली) झालं. मग काहीतरी बोलायचं म्हणून मी तिला विचारलं, "मग काय प्लॅन आहे संध्याकाळचा?"

"शॉपिंगला जायचय पुणे सेन्ट्रलला"

परत माझा मंदपणा उफाळून आला. "पुणे सेन्ट्रल" म्हणजे मला "पुणे स्टेशन" वाटले. तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यापूर्वीच मी पचकलो, "पुणे स्टेशनला काय मिळणार असं विशेष? त्यापेक्षा लक्ष्मी रोडला का नाही जात?"

तिला आता माझी कीव आली होती.

"पुणे सेन्ट्रल हा नवीन शॉपिंग मॉल उघडलाय बंडगार्डन रोडवर. तिथे जाणार आहे."

"ओ आय सी. हां हां मला माहिती आहे, जाहिरात वाचली होती पुणे टाईम्स मध्ये." सुज्ञास सांगण्याची गरज नाही मी "पुणे टाईम्स" वाचतो हे दाखवण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता.

कसाबसा तो थंड चहा मी घशात ओतला. त्यापेक्षा टपरीवर साधा ३ रुपयात मिळणारा चहा कितीतरी पटीने चांगला लागतो. पण काय करणार, सगळ कसं अमेरिकेच्या धर्तीवर व्हायला पाहिजे हा आपला अट्टाहास. तो अट्टाहास मला मात्र बराच महागात पडला. अजून असंच तद्दन फालतू विषयांवर बोलत आमची ती भेट संपली.

मला प्रश्न पडला की असल्या ठिकाणी जाऊन आम्ही काय साधले? आम्ही खूप हाय-फाय आहोत हे एकमेकांना सांगायचं होतं का आम्हाला? खरंतर या भेटी म्हणजे एकमेकांना जाणून घ्यायची एक संधी असते. आपण एकमेकांसाठी अनुरूप आहोत का, आपल्या आवडी-निवडी जुळतात का या थेट हृदयाशी निगडीत गोष्टींसाठी असल्या गोंगाटाची आणि महागड्या हॉटेल्सची गरज असते का? किंबहुना कुठल्याही कारणांसाठी असल्या ठिकाणी जाऊन वेळ, पैसा खर्च करण्यात काही तथ्य आहे का? रॉक म्युझिकचा आवाज, पोरासोरांची अथक बडबड, सिगारेट्सचा धूर अशा वातावरणात या नाजूक रेशीमबंधाच्या गोष्टी होऊ शकतात? कुणाकडे आहे या बदलत्या काळाच्या, बदलत्या राहणीचं आणि बदलत्या विचारांचं स्पष्टीकरण?



ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

6 comments:

  1. Story khup chan aahe. pan कांदेपोहे हे नाव याला suit नाही होत, "टू आईस्ड टीज प्लीज" हे नाव चांगले आहे.

    ReplyDelete
  2. khupch chan aasech story aavdel vachayla. lay bhari

    ReplyDelete
  3. विनोदीशैलीतील पण विचार करण्यास भाग पडणारा लेख सर....अप्रतिम

    ReplyDelete