कोणतीही स्पर्धा म्हटली की तेथे असंख्य स्पर्धक आले. त्यांची एकमेकांवर मात करण्याची धडपड आली. जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि शेवटी इतरांना पराभूत करून विजयी ठरणाऱ्या वीरांचा सन्मान. पण १९०८ सालच्या लंडन ऑलीम्पिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत एक अघटितच घडले! स्पर्धेत एकटाच खेळाडू धावला आणि सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तीनही पदके त्या एकाच भाग्यवान खेळाडूला देण्याचा अजब विक्रम घडला. या ब्रिटीश खेळाडूचे नाव विंडहॅम हाल्सवेल!

झाले होते ते असे की आधुनिक ऑलीम्पिकच्या इतिहासातील ती लंडन येथे झालेली पहिलीच स्पर्धा. स्पर्धेचे नियम व पद्धतीत अजून शास्त्रीय अचूकपणा यायचा होता. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत एक ब्रिटीश व तीन अमेरिकन खेळाडूंनी भाग घेतला. त्यावेळी धावपटूना आखलेल्या रेषेतच पळायचे बंधन नव्हते. त्यामुळे धावताना खेळाडू एकमेकांच्या आडवे येत. अमेरिकेत तर प्रतिस्पर्ध्यांचा रस्ता "ब्लॉक" करण्यावर सुद्धा प्रतिबंध नव्हता. त्यामुळे जॉन कारपेंटर हा अमेरिकन धावपटू विंडहॅम हाल्सवेल या ब्रिटीश धावपटूच्या मार्गात आला. इतकेच नव्हे तर आपले कोपर त्याच्या छातीवर मारून त्याला चक्क ढकलून दिले. सामन्यातील ब्रिटीश पंचांनी हा प्रकार पाहून स्पर्धा ताबडतोब थांबवली व असा अखिलाडू प्रकार चालणार नाही असे सांगून स्पर्धा पुन्हा पहिल्यापासून सुरु करण्याचे आदेश दिला. उपस्थित ब्रिटीश प्रेक्षकांनीही पंचांच्या निर्णयाला उत्स्फूर्त पाठींबा दिला.
परंतु अमेरिकन खेळाडू मात्र खवळले. स्पर्धा पुन्हा खेळवण्याचा पंचांचा निर्णय अमान्य करून ते निघून गेले. त्यामुळे पुन्हा स्पर्धा सुरु झाली तेंव्हा हाल्सवेल या एकाच खेळाडूला पळावे लागले व या स्पर्धेत तीन बक्षिसे होती फक्त त्यालाच मिळाली. अशाप्रकारे एखाद्या खेळाडूला ऑलीम्पिक स्पर्धेत "बिनविरोध" जिंकण्याचा विक्रम करण्याची जगावेगळी संधी मिळाली!
अर्थात यानंतर असे प्रकार घडू नयेत व नियम आणि शिस्तीचे बंधन पाळूनच स्पर्धा व्हाव्यात यासाठी "आंतरराष्ट्रीय हौशी खेळाडू संघटना" स्थापन करण्यात आली व १९१२ साली स्टोकहोम (स्वीडन) येथे भरलेल्या ऑलीम्पिक स्पर्धेपासून सर्व देशांनी समान नियमांचे पालन करून खेळण्यास सुरवात केली.
No comments:
Post a Comment