Wednesday, September 18, 2013

Marathi Article: जीवनाची वाट तुडवताना

Penny wise, Pound foolish! अशी एक म्हण इंग्रजीत आहे. पण खरंतर लहान लहान गोष्टींची काटकसर करायला शिकलं की मोठ्या गोष्टींची  काटकसर कळत नकळत होत राहते. निसटलेला पहिला टाका वेळेवर घातला तर पुढचे नऊ टाके वाचतात अशा अर्थाची म्हण त्या म्हणीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणावी लागेल.
कोणत्याही बाबतीत सुरवात छोट्या गोष्टीपासून व्हावी म्हणजे मोठयाचे आगमन शेवटी आनंददायी वाटते. लहान सहान पदावरून काम करत गेलेला माणूस ज्यावेळी मोठ्या अधिकारावर जातो तेव्हा त्याच्या कामातच नव्हे तर वागण्या-बोलण्यात एक प्रकारची खोली व समृद्धी येते. आजकाल विपुलतेचा जमाना आला आहे. लहान मुलांना डबा भरून चॉकलेट, फ्रीजभरुन कॅडबरीज, चप्पल स्टेन्ड भरून वाहणारे शूज, शोधण्यांत दिवस जाईल एवढे कपडे, शाळेचे साहित्य, वह्या पेन, पुस्तके, टिफिन, खेळणी, सायकली हा खेळ शेवटी तारुण्यात पदार्पण करेपर्यंत मोबाईल, सीडीज, कॉम्पुटर, व्हिडीओ गेम्स आणि पॉकेटमनीनी ओथंबलेल्या खिशापर्यंत जातो.

एवढी साधने पुरवूनही कुठल्याच दिशेने त्यांची साधना होत नसल्याने आई-वडीलांची स्थिती मात्र काहीच "साधे ना" अशी होते. त्यापेक्षा साधे रहा या विचाराने वेळीच रोपण केले असते आणि वस्तूपेक्षा माणसांचा सहवास आणि पुस्तकांशी मैत्री, खेळण्याच्या पसाऱ्याऐवजी मैदानातील खेळ आणि काटकसरीतून फुलणारे गुणवत्तेच्या दिशेने नेणारे नेटके शिक्षण झाले असते तर ते बालफुल पूर्ण क्षमतेने फुलले असते. पण आता त्या फुललेल्या घटत्कोचाला सांभाळणे पालकांच्या शक्तीबाहेरचे ठरते.

Spare the rod and spoil the child! ही म्हण सनातनी वाटत असली तरी यापैकी अमानुष शिक्षेऐवजी वेळीच समज देणारी भीती निश्चित पाल्याला वठणीवर आणू शकली असती. बिंदू बिंदुतून सिंधू निर्माण होतो. कणाकणाने डोंगर बनतो. लहान गोष्टीला महत्व दिले पाहिजे. लहान गुणांचे कौतुक करणे जितके आवश्यक तितकेच लहान अवगुणांचे उच्चाटन करणे जरुरीचे आहे. एखादा सडलेला आंबा देखील संपूर्ण आढी नासवतो. अग्नी, ऋण आणी शत्रू यांचा समूळ नाश करावा असे म्हणतात. आपल्या जीवनात "उधळपट्टी" ही देखील अशीच वाळवीसारखी लहानपणी चिकटते. जळूप्रमाणे आपल्या जीवनाचे सत्व  शोषून घेते आणि सर्व जीवनाला पोखरून त्याचा भुगा करते.

Life

जीवनाच्या उत्तरायणात वस्तूशिवाय जगता  येण्याची  तपछ्चर्या कामाला येते. परावलंबी वृद्धापेक्षा स्वावलंबी ज्येष्ठ नागरिक  सर्वांच्या आदराला पात्र होतात. कोणालाही कसलीही तोशीस  लागू न देता आपला दिनक्रम आपण आखून एखाद्या स्थितप्रज्ञासारखी राहणारी वयोवृद्ध मंडळी ही अशाच वस्तूंच्या आकांक्षांना पिऊन टाकणारे अगस्ती ठरावेत. यावेळी काटकसर, साधी राहणी, सवयी, नियमितपणा, स्वावलंबन या लहानपणातील सवयी त्यांना तारून नेतात.

मोजके बोलणे, तोलून खाणे,  भरपूर चालणे  आणि विचारल्याविना सल्ला न देणे ही सुखी वृद्धाची चतु:सूत्री आहे. म्हणून कवडी कवडीच्या मापाने जमविलेल्या सवयी या जीवनाचा अक्षय ठेवा असतो. हा ठेवा सुवर्णाचा असावा की कोळशाचा हे तुमच्यावर झालेले संस्कार ठरवितात. तुमच्या प्रत्येक कृतीच्या परिणामांच्या बाजू पारखण्याची दिव्य शक्ती तुमच्यात येत राहते. मग बदललेल्या जगातील अवाढव्य सुधारणा तुमच्या तपाच्या उंचीपुढे थिट्या वाटू लागतात. गजबजलेल्या रस्त्यात तुम्हाला हवा तो एकांत साधता येतो. मॉलमधील ठासून भरलेल्या आकर्षक वस्तूंच्या मोहावर तुम्ही विजय मिळविता, घरातील प्रत्येक व्यक्तीचे भिन्न स्वभाव तुमच्या स्वभावाच्या दुसऱ्या टोकाचे असले तरी तुमचा सूर सर्वांना हवाहवासा वाटू लागतो.

वाद्यांच्या गदारोळातही आपला ताल देत गाण्याला साथ देणाऱ्या तालवाद्यांची किणकिण वृद्धांच्या उप्सर्गरहित अस्तित्वाचे प्रतिक बनून जाते. "रंगात साऱ्या रंगूनी रंग माझा वेगळा" म्हणण्याची हातोटी तुम्हाला साधते! जीवनातील बऱ्या वाईट प्रयोगाची शिदोरी मनाच्या पुडक्यात घेऊन अनिर्वचनीय भवितव्यात उडी घेण्याची तयारी ठेऊन तुमच्यातील विवेक ताठ कणा आणि सरळ काठी घेऊन चालू लागतो!


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

1 comment:

  1. समज देणारी भीती

    छान वाटलं

    ReplyDelete