कॉम्प्युटरने सर्व क्षेत्राचा कब्जा घेतला आहे. फोटोग्राफी, डिझायनिंग, प्रिंटींग पासून ते निरनिराळ्या क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञांनापर्यंत संगणकाने मुसंडी मारली आहे. या कॉम्प्युटरला जेंव्हा इंटरनेटचे पंख मिळाले तेंव्हा तर त्याला स्वर्ग दोन बोटावर उरला. कारण नेटमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती क्षणार्धात आपल्या मुठीत छे! बुट्टीत येऊ लागली. साहजिकच असा तयार बेडेकरांचा मसाला किंवा हलदीयांची नमकीन मिळू लागल्यावर घरोघरच्या गृहिणींच्या पारंपारिक पाक कौशल्याचा पार भुगा झाला तसेच खरोखर डोके खाजवण्याऐवजी 'माऊस ' फिरवला की माहितीचा 'पाऊस ' पडतो हे कळले. आता थोडीशी कळ काढ असे म्हणण्याऐवजी ही तेवढी कळ दाब म्हणजे जे जे हवे ते हवेतून आल्यासारखे तुझ्या पुढयात येईल हा आत्मविश्वास वाढला.
पूर्वी डिझाईन्स करताना कलाकारांच्या पाठीचे वाकून धनुष्य व्हायचे. निरनिराळे रंग, पेन्सिली आणि बोरूने अंगभर पडलेल्या डागामुळे एखाद्या रणांगणावरील जखमी योध्याप्रमाणे कलाकार वाटायचा. आता पाहिजे ते कॅरॅक्टर घेऊन त्याचे जोडकाम केले कि सुंदर निसर्गचित्रापासून कार्टूनपर्यंत आणि नक्षीदार कलाकृतींपासून संकल्पनेपर्यंत सर्वच कागदावर चित्तारता येते. आता ही करावी लागणारी जुळवाजुळव म्हणजे फार तर भेलवाल्याप्रमाणे भांडयात चिरमुरे, शेव, पापडी, गाठीया, कोथांबीर, कांदा, खोबरे घालून त्यात चिंचेचे सार घालण्यासाठी लागणाऱ्या कष्टाइतके सोपे वाटत असले तरी प्रत्येक भेळेची चव आणि टेस्ट असते तसेच कलाकाराला यातही संकल्पनेला वाव आहे. सुलभता सुचत असली तरी सगळ्यांनाच हि सुलभता लाभल्याने पुन्हा स्पर्धेला तोंड द्यावे लागतेच.
डिझाईनपेक्षाही जगभरातून प्रसिद्ध होणारे शोधनिबंध आणि विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख हे देखील इंटरनेटच्या पोतडीत उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी इच्छा केली कि देणारा कल्पवृक्ष होता. तसे अक्षर किंवा शब्द टाईप केला कि हव्या त्या विषयाच्या तपशीलवार नोट्स उपलब्ध होतात. त्यामुळे डॉक्टरेट मिळवणे सोपे झाले आहे. सर्व माहितीचे बाड म्हणजे शोध निबंध. मात्र हा तयार करणे आता बौद्धीक काम असले तरी त्यात संशोधनाला दिलेली चालना कोणत्या संशोधनाला हा मात्र संशोधनाचा विषय होईल. वेगळ्या विषयाच्या सखोल अभ्यासातून निघणारे अनुमान ज्याचा पुढील अभ्याक्रमासाठी उपयोग व्हावा. नवे सिद्धांत, नव्या कल्पना, नवीन निरीक्षणे हा पाया आता नवनवीन क्लुपत्या, नव्या ट्रिक्स, नवीन आखाडे आणि बेमालूम आपल्या नावे खपविण्यासाठीचे कौशल्य आपण कोठून कसे काढले त्याचा थांगपत्ता लागू न देण्याचे कसब हीच डॉक्टरेटची कसोटी बनून राहिली आहे. आपल्या शोधनिबंधातील शौर्य कोणते आणि चौर्य कोणते हे कळू न देणे हीच हुषारी आणि त्याचेच फळ म्हणजे डॉक्टरेट.
अर्थात अशा प्रकारे डॉक्टरेट मिळवणे हे चुकीचे आहे, गैर आहे. डॉक्टरेटच्या अमाप पिकांमुळे त्याचा दर्जा खालावला आहे. खऱ्या -खोट्याची गल्लत होत आहे अशी विधाने तथाकथित डॉक्टरांकडून केली जातात. पण त्यांचे काय जाते ? हल्ली डॉक्टरेट झाल्याशिवाय कन्फर्मेशन मिळत नाही. मग त्यासाठी इन्फर्मेशन दुसरीकडून घेतली तर काय बिघडले ? आणि रोज नवे नवे संशोधन कोठून करणार ?
हल्ली नावावर काहीतरी चढले पाहिजे, ते चढले की पगाराचे आकडे चढतील. त्यासाठी टाकाऊतून टिकाऊ हि "Reverse Motion" हा या संशोधनाचा गाभा असून कट-पेस्ट कलाकृती या नव्या संकल्पनेला आपलेसे करणारेही काही कमी नाहीत. त्यासाठी कॉम्पुटर इंटरनेट आहेच की!
No comments:
Post a Comment