Sunday, September 29, 2013

Marathi Article: मुले का शिकत नाहीत?

परवा एका कार्यक्रमामध्ये बोलताना एका विदुषीने विधान केले की
आजकाल एवढया सुखसुविधा, साधने आणि सोयी असूनही विद्यार्थी शिकायला तयार का नाहीत? याचे कारण म्हणजे आपण त्याला जरुरीपेक्षा जास्त ताण  देत आहोत. त्याला ज्ञानाची भूक लागली नसताना कितीही दिले तर तो ते स्विकारणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भूक निर्माण झाल्याशिवाय शिकविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरणार. तेव्हा ही जिज्ञासेची भूक कशी वाढवायची हा सर्व शाळांसामोरचा प्रश्न आहे. टारगटपणा, खेळ, फॅशन किंवा चैनी यात रस घेणारे हे विद्यार्थी शाळेतील ज्ञानार्जानाला साद का देत नाहीत?
ज्ञानाची लालसा, ज्ञानपिपासूपणा किंवा ज्ञानशाखेच्या दृष्टीने सक्षम वाटचाल करणे, त्यासाठी कष्ट वेचणे, रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्टा करणे ही विद्यार्थी लक्षणे लोप पावत चालली आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण आज वयाच्या २५-२६ व्या वर्षी अभियांत्रिकी, आयटी क्षेत्रातील विद्यार्थी त्यांच्या वडिलांची निवृत्ती वेळी मिळविला नसेल एवढा स्टार्ट घेऊन नोकरीची सुरवात करत आहेत. त्यांच्या पॅकेजचे आकडे ऐकले तर भोवळ येईल असा मामला आहे. २५-३० वर्षाचा विद्यार्थी १० वेळा परदेशात जाऊन येत आहे. १८-१९ वर्षांचा विद्यार्थी ज्यावेळेला पासपोर्ट काढून शिक्षणासाठी व्हिसाच्या रांगेत अमेरिकन किंवा इतर देशांच्या कॉन्सुलेटपुढे उभा राहतो त्यावेळी तो ज्ञान घेताना दिसत नाही असे म्हणता येत नाही. ज्ञानाच्या रुंदावलेल्या कक्षा विद्यार्थ्यांना निश्चित मोह घालीत आहेत. सकाळी साडे दहा ते साडे पाच ही 'टिपिकल बाबू' टाईप नोकरी आता इतिहासजमा झाली आहे. एकाच खात्यात रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंत इफ़िशियन्सी बार पार करीत पाट्या टाकणार्‍या 'गुळगुळीत' नोकऱ्यांचा जमाना बदलून गेला आहे.

आयटी क्षेत्रातील कार्यालयातून सकाळी ६.३० पासून रात्री १२-१२ वाजेपर्यंत आपल्याला 'क्युब' मध्ये बसून राक्षसी प्रोग्राम लिहिणारी, क्लिष्ट संगणकीय माहितीचा सिक्वेन्स जुळवणारी आणि रोज नवनवीन अवजारे घेऊन जगातील वेगवेगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी पिढी तयार झाली आहे. फक्त पोथीनिष्ट ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान, पाठांतर ही संज्ञा आता मागे पडली आहे.

निश्चित आजच्या या शिक्षण पद्धतीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या या 'एकलकोंड्या' जॉबमुळे एक वेगळी संस्कृती उदयास येत आहे. आपापल्या कार्यालयातील क्लब, कविता वाचन, सहली, गेट टुगेदर, हास्य विनोद आणि कोणाच्या तरी घरी रविवारी धाड टाकून भजी, मिस्सळचा आस्वाद घेत काव्य, शास्त्र, विनोदाचा मसाला तोंडी लावत एकमेकांच्या 'वहिनींच्या'पाककलेची गोडी चाखत खेळीमेळीच्या आयुष्यातील आनंद लुटणाऱ्या संकल्पना मात्र हद्दपार झाल्या आहेत. आजचे ऑंफीस परस्परांना भेटते ते संगणकावर. गप्पा होतोत त्या मोबाइलवर. प्रतिक्रिया दिल्या जातात त्या इंटरनेटवर आणि आनंद मिळविला जातो तो जगाला कवेत घेणार्‍या त्या पडद्यावर किंवा पृथ्वीला खिशात घातलेल्या त्या मोबाईल-आयपॅड किंवा तत्सम आधुनिक कर्णपिशाच्चाच्या संगतीमध्ये.

प्रत्यक्ष भेटीचा आनंद लोप पावत चालला आहे. साहजिकच शिक्षणाचा जो मूळ हेतू माणूस घडवणे, आदर्श निर्माण करणे व पुढच्या पिढीला वस्तुपाठ घालून देणे, ते लोप पावत चालल्यामुळे मुले शिकत नाहीत अशी विधाने येऊ लागली आहेत. मुले आपल्याला हवे त्याऐवजी त्यांना हवे ते शिकायला का धडपडत आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. पीएसआय किंवा डीएसपी होऊन गुन्हेगारी मोडून टाकीन असा निर्धार करणारी तरुणांची पिढी पुढे येत नाही. कारण राजकारणी-गुन्हेगारांच्या साट्यालोट्यातून निष्प्रभ आणि भ्रष्ट होऊन निष्क्रिय बनलेली पोलीस यंत्रणा त्यांच्यापुढे आहे. कलेक्टर, तहसिलदार, प्रांत अधिकारी होऊन रेव्हेन्यू खात्यातील भ्रष्टाचाराची जळमटे झाडून टाकणारी उर्मी तरुणांमध्ये नाही. कारण अवैध धंद्यातून नेतृत्व गाठलेल्या लोकांसाठी आणि प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेल्या स्थानिक स्वराज संस्थांसाठी  आपली बुद्धीमत्ता पणाला लाऊन सामान्य माणसापर्यंत विकासाची फळे कशी पोहोचवायचीत याची भ्रांत त्यांना आहे. य:कश्चित अल्पशिक्षित, लांड्या लबाड्या करून समाजात प्रतिष्ठेने वावरणार्‍याना जोपर्यंत समाजात प्रतिष्ठा मिळत राहील तोपर्यंत शाळेत ज्ञानाची भूक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या गुरुजनांनी या प्रश्नांची विद्यार्थ्यांना काय उत्तरे द्यावीत म्हणजे हे विद्यार्थी आपला अभ्यास नियमितपणे, मन लाऊन करतील आणि अपेक्षित आदर्शाप्रत जातील? हा प्रश्न प्रत्येकाने चिंतन केल्यास त्यांच्या ज्ञानाच्या भुकेच्या गोळ्या सापडतील.


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

1 comment:

  1. बदललेल्या शिक्षणपद्धतीचा हा परिणाम आहे की नाही हे ठाऊक नाही. पण आजकाल मुलांना फार चटकन गोष्टी मिळतात. आई, वडिल नोकरी/करिअर करणारे असल्याने वेळ नाही पण बाकी सारं देऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी जी धडपड करावी लागते त्याची ओळख या मुलांना नाही. त्याचाच हा परिणाम असावा.

    ReplyDelete