Saturday, September 14, 2013

Marathi Article: आयटम साँग पुरतीच अश्लीलता?

आपण सर्वजण किती ढोंगी, खोटारडे आणि दुटप्पी वागणारे आहोत याचा अश्लील गाण्यांना टीव्हीवर बंदी घालण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. "मुन्नी बदनाम हुई", "शीला कि जवानी" , "हलकट जवानी" अशी काही उत्तान व बीभत्स गाणी टीव्हीवर दाखवू नयेत अशी सेन्सॉर बोर्डाने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात प्रक्षोभक जाहिराती व स्त्री-देहाचे भडक दर्शन घडवण्यात टीव्हीने आता इतकी पुढची पायरी गाठली आहे कि अशा गाण्यातली अश्लीलता त्यापुढे अगदीच मवाळ ठरेल.

Bollywood Item Song

एकीकडे चित्रपटात उत्कट प्रेमाचा आविष्कार दाखवणाऱ्या चुंबनाही बंदी आहे. परंतु अत्यंत सूचक लैंगिकता आणि वासनेचा धगधगता आविष्कार याचे मात्र वावडे नाही. पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिराती, "डीओडरंट", "पुरुष शक्तिवर्धक औषधे" या आणि अशाच वस्तूंच्या मार्केटिंगसाठी स्त्री मॉडेल्सचा मर्यादहीन वापर केला जातो त्याचे काय? अमेरिकन संस्कृतीचे अनुकरण करायला हरकत नाही पण त्यासाठी सगळीच "सिस्टीम" तशी बनवावी लागेल. आपण सोपा मार्ग काढून फक्त वासनांध कामुकतेचे प्रदर्शन घडवत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचे मुक्त अनिर्बंध समाजजीवनही नाही आणि सभ्य भारतीय संस्कृतीही नाही अशा एका भ्रष्ट, बांडगुळासारख्या उपऱ्या जगण्यातच आपण विकृत आनंद घेत आहोत.

गुंड, गुन्हेगार लोक "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमात मिरवत आहेत, देणग्या देवून धनिक लोक प्रतिष्ठा विकत घेत आहेत, त्यांचे कौतुकाचे सोहळे वृत्तपत्रात - टीव्हीवर रंगत आहेत हाही अश्लीलतेचाच भाग नाही का? आपल्या केजी - नर्सरीतल्या मुलींना तोकड्या कपड्यात नाचताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या आधुनिक माता, अंगातले जमेल तेवढे कपडे काढून पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांना खाद्य पुरवणाऱ्या मादक नृत्यांगना आणि हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत.

अश्लील आयटम सॉंगवर बंदी घातल्यामुळे सर्व आलबेल होईल असा आशावाद बाळगणे म्हणजे कोंबडा झाकण्यासारखे आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे  आणि नैतिकतेचे उन्ह रणरणत असताना दोन - चार गाण्यांवर बंदी आणून सभ्यतेची  सावली समाजाला मिळणार नाही.ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

1 comment:

  1. नविन आयटम सॉंग http://youtu.be/7AkSGs6zNOs

    ReplyDelete