Wednesday, September 4, 2013

Marathi Article: रजत गुप्तांचा धडा!

अमेरिकेला गेलेले आणि तिथल्या कार्पोरेट जगतात अतिउच्च स्थानी पोहोचलेले जे काही मोजके भारतीय आहेत त्या सर्वात रजत गुप्त हे नाव ठळकपणे घ्यावे लागेल.  मॅकिन्जे, गोल्डमन सॅक्स आणि अशाच अनेक जगविख्यात, अवाढव्य आकाराच्या कंपन्यांचे प्रमुखपद, संचालकपद हाताळणारे एक अत्यंत कार्यक्षम कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अशी त्यांची प्रतिमा. पण एका मित्राला फायदा व्हावा म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. अमेरिकेतील न्याययंत्रणा इतकी कार्यक्षम व नि:पक्षपाती कि अवघ्या अठरा महिन्यात या आरोपाची शहानिशा झाली आणि गुप्ता यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

United States Judicial System

त्यांची बड्या आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपन्यांमधील कारकीर्द इतकी झगमगती होती कि संगणक बादशाह बिल गेट्स, युनोचे सरचिटणीस कोफी अन्नान आणि अमेरिकेतील अनेक उच्चपदस्थ त्यांच्या बचावासाठी धावून आले. रजत गुप्ता यांनी आयुष्यभर केलेल्या महान कार्याचे दाखले दिले गेले. भारतातले उद्योगपतीही त्यात मागे नव्हते. मुकेश अंबानी यांनीही गुप्तांच्या इतर सर्व उपयुक्त गुणांकडे दुर्लक्ष होऊ नये असे साकडे घातले. परंतु यातल्या कोणत्याही दबावाला भीक  न घालता अमेरिकेतील न्यायव्यवस्थेने हा कठोर निकाल दिला आहे. कारण कोणीही उच्चपदस्थ कितीही समाजोपयोगी असला तरी आर्थिक संस्थांवरील लोकांच्या विश्वासाला तडा गेल्यास होणारी हानी फार मोठी असते हाच विचार प्रभावी ठरला. या सर्व प्रकरणातून भारतालाही धडा नव्हे तर धडे घेत येतील.

पहिला धडा असा कि कितीही बडा आरोपी असला तरी त्याच्यावरील आरोपाची निष्ठुरपणे चौकशी झालीच पाहिजे. दुसरा म्हणजे न्यायालयीन कामकाजात वेळकाढूपणा न करता झटपट निकाल लागला पाहिजे. तिसरे म्हणजे राजकीय हस्तक्षेप करून सर्वच प्रकरणातला गुंता वाढवायचा, साक्षीदार फोडायचे, फाईली गडप करायच्या व सर्वच प्रकरण संभ्रमावस्थेत नेऊन खरे व खोटे यातील सीमारेषाच पुसून टाकायची हा खास "भारतीय न्यायपद्धती" बाहेरच्या जगात चालत नाही. सौम्य शिक्षेची गुप्ता यांची विनंतीही कोर्टाने झिडकारून गुन्ह्याला योग्य अशी शिक्षा भोगलीच पाहिजे हाही धडा यानिमित्त दिला आहे. स्वतंत्र भारताच्या गेल्या पासष्ठ वर्षाच्या इतिहासात असा एखादाही धडा आपणास मिळाला नाही, हे दुर्दैव!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment