Saturday, September 21, 2013

Marathi Article: गुणवान पण उपेक्षित कलाकार: सुमन कल्याणपूर

एखादा कलावंत अत्यंत गुणी असावा आणि तितकाच दुर्दैवी असावा अशी खूप उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अंगच्या अस्सल कलागुणांना पुरेसा वाव मिळाला नसल्याने त्या गुणांचे चीज झाले नाही, समाजाला अशा गुणी कलाकारांची खरी ओळखच पटली नाही असेही बऱ्याचदा होते. याचे एक जीते-जागते खणखणीत उदाहरणं म्हणजे पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर! आज वयाच्या ७५ व्या वर्षी अत्यंत तटस्थपणे, कोणतीही कटुता न बाळगता, आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध 'ब्र ' ही  न काढता शांतपणे वृद्धत्व जपत, एकांतवासात समाधानाने जगणारी गायिका!

Suman Kalyanpur

तुम्हाला 'ब्रह्मचारी' चित्रपटातले 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर' हे गाणे आठवते का बघा! ते लताने म्हटले आहे असे तुम्हालाही वाटते ना ? खूपजणांना हे गाणे सुमन कल्याणपूर नावाच्या गायिकेने म्हटले आहे हेच माहित नाही. सुमन कल्याणपूरने यापेक्षाही मोठे दुर्दैव आणि निराशा सहन केली आहे. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात सर्वच काही सभ्य आणि नीतिमान आहेत असे नाही. उलट तसा बुरखा पांघरणाऱ्यानीच जास्त अन्यायकारक लबाड्या केल्या आहेत. त्यांनीच सुमन कल्याणपूर यांच्या वाटचालीत काटे पेरले. या सभ्य, सुसंस्कृत गायिकेची वाटचाल थांबवण्याचे दुष्कर्म केले.

सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळेच झाला. एका गाण्याच्या कार्यक्रमात तलतने तिचा आवाज ऐकला आणि तो भारावूनच गेला व त्याने तिची शिफारस केली.  तिच्याबरोबर चित्रपटातले पहिले गाणे त्याचेच. तिच्यासारख्या नव्या दमाच्या गायिकेला चित्रपटसृष्टीकडून खूपच अपेक्षा निर्माण झाल्या पण त्या पुऱ्या झाल्या नाहीत. असा प्रवाद आहे कि सुमन कल्याणपूर ही आपली तुल्यबळ प्रतिस्पर्धी ठरेल या भावनेने एका मातब्बर गायिकेने सुमनला रेकोर्डिंग स्टुडीओच मिळू नये इथपर्यंत कारस्थाने केली. सुमन कल्याणपूरचा मोठेपणा हा कि तिने याबाबत त्यावेळीच नव्हे तर त्यानंतरही अगदी आजपर्यंत कधीही तक्रार केली नाही. इतकेच नव्हे तर यावर कुणी जाणकार पत्रकाराने खोदून विषय काढला तरी ती तो विषय टाळते.

 'ना तुम हमे जानो' , 'दिल गमसे जल रहा' , 'मेरे मेहबूब न जा', 'युं हि दिल ने चाहा था' अशी लोकप्रिय गाणी त्यांनी गायिली. रफी, मन्ना डे , तलत , हेमंतकुमार या समकालीन श्रेष्ठ गायकांबरोबरच तिची अनेक गाणी गाजली.

सुमन कल्याणपूर या मूळच्या  बंगालच्या. आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का इथे १९३७ साली त्यांचा जन्म झाला. सुमन हेमा डे हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या मुंबईत आल्या. शास्त्रीय संगीताचा त्यांनी कसून अभ्यास केला. बंगाली, उरीया, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपूरी या भाषातील गाणीही त्यांनी म्हटली. गझल, ठुमरी, भक्तिगीते यात त्यांना जास्त गोडी. 'रिमझिम झरते श्रावण धारा', 'शब्द शब्द जपून ठेव', 'केशवा माधवा', 'ओमकार प्रधान रूप गणेशाचे', 'जिथे सागरा धरणी मिळते' , 'नाविका रे वारा वाहे  रे', ' या लाडक्या मुलानो' अशी त्यांची अनेक गाणी मराठी मनांना वर्षानुवर्षे मोहवत आहेत.

अलिकडे २०१० साली महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर पारितोषिक देऊन सुमन कल्याणपूर यांचा गौरव केला. याहून मोठा आणि याहून कितीतरी अधिक जास्त लोकप्रियतेला त्या पात्र होत्या. पण एखाद्याचे नशीब!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment