
[Image Attribution: SeeMingLee]
'सेलिब्रिटी' या नावाने ओळखली जाणारी जमात हल्ली बर्याच कार्यक्रमात दिसते. काही वेळा या सेलिब्रेटींना कार्यक्रमाचे संयोजक चक्क पैसे मोजून आणतात. टीव्ही सिरियलमधले तारे-तारका, खेळाडू, नाटक - सिनेमातल्या नट-नट्या, वेगवेगळे विक्रम करून माध्यमांनी प्रसिद्धीस आणलेले कलाकार, आपली कला, कौशल्य, जन्मजात वैशिष्ठ्यांची देणगी लाभलेले विक्रमवीर अशा अनेक प्रकारच्या सेलिब्रिटींचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत लोकप्रियता 'कॅश' करून घेण्याची त्यांची धडपड असते. विशेषत: टीव्ही सिरियलमधल्या 'प्रचंड लोकप्रिय' कलावंतांचे सेलिब्रिटी लाईफ तर काही आठवडे-महिने इतकेच असते. त्या वेळातच त्यांना जिथे जमेल तिथे चमकून घ्यावे लागते.
आपली लोकप्रियता पैशात वसूल करण्याच्या वृत्तीबद्दल कुणाला वाईट वाटायचे काहीही कारण नाही. कारण शेवटी प्रत्येकाला काहीतरी विकूनच आपले पोट भरायचे असते. कुणी श्रम विकतात, कुणी बुद्धी विकतात तर कुणी शरीरही विकतात. सेलिब्रिटी म्हणविणारे आपली लोकप्रियता विक्रीला काढतात इतकेच. त्यामुळे करोडपती अमिताभ बच्चन तेलाची जाहिरात करतो तर सचिन तेंडूलकर कॉम्प्लॅनची. इथपर्यंत ठीक आहे. पण इथे प्रश्न निर्माण होतो की आपल्या कलेचा बाजार मांडणार्या सितार्यांनी कोणत्याही विषयावर केलेले मत प्रदर्शन कितपत योग्य आहे?
एका क्षेत्रात नाव कमावल्यानंतर बाकीच्या क्षेत्रातही त्यांनी तज्ज्ञ म्हणून मते मांडावीत काय आणि त्यालाही प्रसिद्धी मिळावी काय हा प्रश्न पडतो. किंवा अशा लाडक्या सेलिब्रिटींना व्यवहाराचे नियम पाळण्याचे बंधनच लावायचे नाही काय? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका आहेत म्हणून त्यांना स्टुडीओची जमीन मनाला येईल तशी विल्हेवाट लावू देणे, तेंडूलकरच्या आलिशान गाडीवरील टॅक्स माफ करणे यातून हेच दिसते. तेंडूलकर जाहिरातीत चमकण्यासाठी पैसे घेतो. त्यावर 'मॉडेलिंग' चा व्यवसाय म्हणून कर आकारणी करा अशी त्याची मागणी आहे. तो मॉडेल म्हणून पडद्यावर दिसतो तो क्रिकेटमधल्या कामगिरीमुळेच ना? मग क्रिकेट खेळणे हा त्याचा व्यवसाय आहे कि मोडेलिंग करणे आहे हा? एका क्षेत्रातल्या कर्तबगारीचा फायदा घ्यायचा आणि त्याचा उपयोग दुसर्या क्षेत्रात करून पैसा कमवायचा. त्यातही सवलत मागायची. हा प्रकार योग्य नाही!
No comments:
Post a Comment