अक्षराची ओळख आणि पदव्यांची माळ म्हणजे ज्ञान हा फार मोठा गैरसमज सगळीकडे पसरला आहे. वास्तविक ज्ञानाचा साक्षरतेशी कांहीही संबंध नाही. पूर्वीच्या काळी अनेक संशोधक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांच्या कलेची हजारो वर्षे प्रशंसा होत आहे. त्यांच्या कलाकृतीखाली त्यांची नावेही घातलेली नाहीत. पण ते अनामिक त्यांच्या कलेच्या रूपाने अजरामर झाले आहेत.
ताजमहाल घडवणारे वास्तुशास्त्रज्ञ त्या काळातील वाहतूक, प्रचंड शिळा, यंत्र सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता त्यांच्या कलेचा गौरव करणे निश्चित अभिमानास्पद आहे. त्या काळातील कोणत्याही रोगावर निदान करणारे वैद्य कोणत्या मेडीकॅल कॉलेजची पदवी घेतलेले होते? गावोगावी झाडपाल्यांची व कंदमूळांची औषधे देणारे धनगर किंवा रांगडे आदिवासी कोणत्या महाविद्यालयात शिकले? फार कशाला हॉटेल मॅनेजमेंटच्या 'Chef' चा कोर्सही न करता आपल्या आजी, आई, आत्या ज्या प्रकारची पुरण पोळी, कोथिंबीरीच्या, आळूच्या वड्या , थालीपीठ करायच्या त्या आज भल्या भल्या डिग्र्याधारकांनाही आणि पंचतारांकित हॉटेलच्या खानसाम्यानाही नाही जमत. या सगळ्यामागे कलेचा ध्यास होता, एकाग्रता होती. जे करू ते उत्तम दर्जाचे करू हि शिकवण होती. कोणाच्या तरी हाताखाली नम्रतेने घेतलेली संथा होती. आपले कौशल्य कोणाच्या तरी पायी अर्पण करण्याचा अर्पणभाव होता. मानवजातीचे वेगळेपण आपल्या अंगाच्या उपजत गुणांनी समृद्ध करण्याची आकांक्षा होती. म्हणून साधनांची कमतरता असताना त्यांनी उंची गाठली. कारण साधनेची उणीव नव्हती. या गोष्टी कदाचित प्रयत्नाने, प्रयासपूर्वक व सवयीने जमल्या म्हणता येईल. कदाचित या गोष्टीना साक्षरतेची आवश्यकताही नसेल. पण ज्या गुणांना अक्षराची महिरपी लागते, सूर, ताल, लय यांच्या जोडीला शब्दांचे सामर्थ्यही आवश्यक असते ते कवित्व बहिणाबाईला कोणत्या अक्षराच्या ओळखीने सुचले? त्यासाठी निसर्गाशी एकरूप होण्याची साधना आणि आपल्याबरोबर किड्या-मुंगीपासून पशुपक्षांपर्यंत जगणाऱ्या सर्व जीवांशी प्रेम करावे लागते. तरच हृदयातून कलेचे हे हुंकार फुटतात.
भूक, भय, निद्रा आणि मैथुनाच्या पलीकडे जाऊन जो विचार करतो तोच खरा माणूस असतो. दुर्दैवाने आज आपण माणूस म्हणविण्याच्या योग्यतेचे राहिलो नाही. कारण या चार खांबावरच आपल्या दुर्दैवी आयुष्याचा डोलारा उभा आहे. यातून फक्त जगणं एवढंच कळतं. जगण्याचा हव्यास बाकी काही करू देत नाही. मग इतर प्राण्यांच्यात आणि मनुष्यात भेद उरत नाही. निदान भूक भागल्यावर प्राणी गप्प तरी बसतो. ते देखील माणूस शिकत नाही. त्यामुळे प्राण्यापलीकडे पोहोचलेली आपली भूक सर्वांची झोप उडविणारी समस्या होऊन बसली आहे.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी सर्वांच्या मालकीच्या आहेत. त्याचा प्रामाणिक वापर व्हावा. आपले पोट भरण्याइतकेच मिळवावे. मी समाधानी झाल्यावर आजूबाजूला पाहावे. ही सहजीवनाची गरज हजारो वर्षांच्या सहानुभूतीनंतरही माणसांत कशी उतरत नाही याचे आश्चर्य वाटते. म्हणून कदाचित बहिणाबाई ' अरे माणसा माणसा कधी व्हशील मानूस ' असं म्हणत असावी.
No comments:
Post a Comment