
अमिताभ बच्चन हे मध्यंतरी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की आपले वडील आयुष्याच्या अखेरीस आपले (म्हणजे अमिताभचे) चित्रपट पाहण्यात रंगून जात. दुर्जनांवर सज्जन मात करतात हा काव्यगत न्याय (पोएटिक जस्टीस) त्यांना खूप भावत असे म्हणे! बच्चन साहेबांच्या या काव्यमय भाषेतील मताचा व्यवहारातील अर्थ असा होतो की लोकांना टीव्हीवरील किंवा सिनेमातील चकचकीत घरे, श्रीमंत राहणी आणि सज्जनाने दुर्जनावर केलेली मात या सर्वांतून एक प्रकारचा दिलासा मिळत असतो.
आपणा भारतीयांची व्यक्तीपूजा टोकाला जाणारी आहे. एका क्षेत्रातील कर्तबगार माणसाचे देव्हारे सर्वच क्षेत्रात माजवले जातात. उदाहरणार्थ एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या रुपेरी पडद्यावरील 'देवांचे' राजकारणात देव्हारे माजले. 'अँग्री यंग मॅन' म्हणून पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या अमिताभने केलेला उपदेश लोक भाविकपणे ऐकू लागले. अभिनेता अमिताभ लगेच थोर समाज सुधारक होतो.
वास्तविक जाहिरातींच्या जगात दिसणारे जग हा एक आभासाच असतो. पण त्यातले छान छान बंगले, खोटे खोटे पेच प्रसंग, कोणताही उद्योग न करता देश विदेशातून सहली करणारी माणसं, वयाला न शोभणार्या तत्वज्ञानाची भाषा बोलणारी लहान मुले हे सर्व भासमान जग जनतेने आपले रोजच्या जगण्यातले दु:ख विसरण्यासाठी पाहायचे असते. प्रत्यक्ष जगण्यातला संघर्ष तात्पुरता विसरावा एवढीच अपेक्षा असते.
आज सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि मूल्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून लोकांनी परीकथेतील 'चॉकलेटचे बंगले' पाहून समाधान करून घ्यावे असाच या एकेकाळच्या अँग्री यंग मॅनचा कॉमनमॅनला सल्ला आहे. लोकांनीही आपण सुखी असावे, आनंदी रहावे वगैरे फालतू इच्छा बाळगण्यापेक्षा 'आयकॉन'चा दर्जा मिळालेल्या सुपरस्टारनी स्वप्नसृष्टीत नेणारे 'चॉकलेटचे बंगले' पाहण्यातच समाधान मानावे. अफूच्या गोळीच्या गुंगीत वास्तवाचे भीषण चटके नष्ट करण्याचे सामर्थ्य असते हे विसरू नये!
No comments:
Post a Comment