Friday, November 1, 2013

लबाडी - आमचा राष्ट्रीय उद्योग! (Marathi Article)

आपल्या देशाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. आपली सांस्कृतिक परंपरा खूप मोठी आहे. एकेकाळी जगाचे नेतृत्व करणारा भारत अनेक उद्योगांचे माहेरघर आहे. ब्रिटीश सत्तेच्या टाचेखाली त्यातले बरेच उद्योग नष्ट झाले. पण स्वातंत्र्यानंतर मात्र एक उद्योग चांगलाच फोफावला आहे. तो आहे लबाडी!

[image attribution: benuski]

यशस्वी व्हायचे असेल तर फसवाफसवी, खोटेपणा, बनवाबनवी असे अनेक गुण अंगी बनवले पाहिजेत याबद्दल आता सर्वांचीच खात्री पटायला लागली आहे. छोट्या दुकानदारापासून बड्या उद्योगपतींपर्यंत आणि गावगन्ना पुढार्‍यापासून राष्ट्रीय नेत्यांपर्यंत सर्वांनी लबाडीचा उद्योग करून चांगलीच भरभराट करून घेतली आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करून, शेतात राबून जगण्यासाठी धडपड करणार्‍यांनीही आता कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त मिळकतीचे आकर्षण वाटू लागले आहे आणि त्यासाठी एक जादूची छडीही सापडली आहे - ती आहे लबाडी!

सर्व गुण श्रीमंतांच्या आश्रयाला जातात असे एक जुने वाचन आहे. ते आजही खरे आहे. समाजात आज जे धनवान आहेत ते सर्वगुण संपन्न असल्याचा पुकारा होतो. धनाच्या सहाय्याने सत्ता मिळवणे व सत्तेच्या सहाय्याने धन कमावणे हा उपउपयोग राजकारण्यांनी वाढवला. त्याचबरोबर लोकांना हवे ते देण्यापेक्षा आपणाला हवे ते लोकांच्या माथी मारण्याचा उपउद्योग उद्योगपतींनी सुरु केला. त्यामुळेच पाणी नाही, रस्ते नाहीत, वीज नाही अशी अवस्था असतानाही टीव्ही, मोबाईल, मोटारगाड्या हे उद्योग भरभराटीला आले आहेत. नैतिकतेचा बुरखा टाकून आता 'नफा' हा एकमेव धर्म मानणारे उद्योजक 'आदर्श' म्हणून मिरवू लागले आहेत. काळ्या बाजारातून धनराशी गोळा करणारे, गुटखा विकून गडगंज होणारे, मादक पदार्थांची तस्करी करून अलिशान गाड्या उडवणारे हे सगळे आता तरुणपिढीचे 'आयकॉन' झाले आहेत. खालच्या पायरीवरचे दुकानदारही भेसळ करणे, मापात फसवणे अशा क्लुप्त्या करून ग्राहकांना लुबाडत आहेत.

दुसर्‍याने आपल्याला लुबाडले तर तक्रार करण्यापेक्षा आपणही दुसर्‍याला लुबाडावे हा 'चाणाक्षपणा' आता सामान्य लोकांनाही मान्य होऊ लागला आहे. त्यामुळेच महागाईत होरपळतानाही  चळवळीपेक्षा लबाडीने महागाईवर मात करण्याची केविलवाणी धडपड चाललेली असते. 'ही सिस्टीम बदलता येणार नाही, आपणच शेरास सव्वाशेर झाले पाहिजे' हा उपदेश चांगले चांगले बुद्धिवंतही करू लागले आहेत. जंगलराज यापेक्षा काय वेगळे असते? अशा परिस्थितीमुळे  लबाडीच्या राष्ट्रीय उद्योगाला राज्यामान्यतेबरोबरच लोकमान्यताही मिळू लागली आहे!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

2 comments: