Tuesday, November 5, 2013

मुले कार्टून का पाहतात?

प्रयत्न करूनही अभ्यासाला न बसणारी मुले कार्टून पाहायला मात्र नेहमी एका पायावर तयार असतात. कार्टूनचे विषय हे मुलांना आवडणारे असतात हे निश्चित! पण प्रत्येक माणसात - मुलात एक भाबडा जीव तग धरून असतो. चांगल्या गोष्टींचं निर्दालन व्हावं आणि सगळीकडे रामराज्य किंवा सुराज्य यावं असं  त्याला वाटत असतं. बाहेर मात्र सगळी परिस्थिती अगदी उलटी असते. गरीबी, अज्ञान, खेळायला मैदान नाही, अभ्यासाचे अनाठायी ओझे, शाळांचे भारंभार अभ्यास, सुप्त गुणांना वाव देणार्‍या  प्रकल्पांचा अभाव, घरी जबाबदार पालकत्वाचा अभाव - एकंदरीत बालसुलभ मोकळ्या वातावरणाची जी वाणवा असते त्यातून स्वप्नातील प्राणी, पक्षी, राक्षस, पर्‍या, झरे, बागा, खेळ, मैदानांची आणि खाण्यापिण्याची विपुलता हे सगळे ज्या वातावरणात अनुभवायला मिळतं त्याचं नाव स्वप्न!

[image attribution: torley]

हे स्वप्नरंजन पूर्ण करण्याचं काम कार्टून करतात. यातील पात्रांना जंगलात, शाळेत, बाजारात, मॉलमध्ये, प्राणी संग्रहालयात मनमोकळेपणाने वागू देणारी मंडळी कार्टूनमध्ये असतात. त्यातून उपजत खोडकरपणांना या कार्टूनमध्ये पूर्ण संधी दिली जाते. किंबहूना सीन-चॅन सारख्या द्वाड मुलांच्या खोङयांचे कौतुक होताना पाहायला मिळते. बाहेरील जगात कानफटात ठेऊन देणारी राक्षस मंडळी कार्टून जगतात नसतात. लाड, समुद्र किनार्‍यावर फिरणे, भेळ -आईसक्रीमची खैरात, सर्वांना टपल्या मारण्याची मुक्त सोय यामुळे मुलांना हवहवसे जग कार्टून पुरवत असतात. आगगाडी, रोबोटची फायटिंग, विमानाच्या ताफ्यांच्या करामती, रणगाड्यांची धडपड अशा शौर्याच्या कथा बघताना मुले किती अधीर झालेली दिसतात . हनुमानाच्या लंकेतील लिला पाहताना टाळ्या वाजवणारी मुले टीव्ही बंद झाल्यावर मात्र लंकेत असल्यासारखी मख्ख होतात.
श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची करामत, अर्जुनाची वेगवान अस्त्रे, भीमाच्या गदेचे टोले, राक्षसांची दाणादाण पाहून मुले टाळ्या पिटतात. बिरबल, तेनालीरामनच्या चातुर्याने ती थक्क होतात. प्राण्यांचे संवाद, पक्षांचे नाच, अदभुत दुनियेतील करामती ही त्यांची बालसुलभ गरज कार्टून पुरवतात. तशात कालसुसंगत स्पायडर मॅन किंवा जुरासिक पार्क मधील नाविन्यता त्यांना भावते.

मुलांच्या वयाची ही भूक असते. बगीच्यातील बालोद्यान असो की श्रीमंत अमेरिकेचा डिस्ने लॅंड असो, मुलांच्या लहान विश्वातील मोरपंखी भावनांना कुरवाळणारे हे जग असते. आजच्या 'ऑडिओ विजुअल' च्या जगात कार्टून्स हाच प्रत्येकाच्या बालपणाच्या सशाचा रोल करत आहे. सशाचा सिंह झाला की त्याची भूक बदलते. पण असे स्वच्छंदी, निर्मळ, सुंदर, रेखीव, भल्याचे कौतुक करणारे, दुष्टांना शिक्षा करणारे, सज्जनांना हात देणारे आनंददायी जग ही मुलांची भूक आहे. कार्टून हे त्या बालसुलभ भुकेचे बालसुलभ ग्राईप वॉटर आहे!




ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

No comments:

Post a Comment